www.24taas.com,कराड
अजितदादांचा ताप एका दिवसात गेला, ते बरे झाले आणि लगेच ते कामालाही लागले, हेही चांगलेच आहे , असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लगावला.
ताप आल्यामुळे गुजरातमधील बडोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला दांडी मारणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार दुसऱ्याच दिवशी काही कार्यक्रमांना मुंबईत उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या आजारपणाबाबत चर्चा सुरू होती. नाराजीतून अजित पवार अधिवेशनाला गेले नाहीत, अशी कुजबूज सुरू होती.
अजित पवारांच्या तापाबाबत शरद पवारांना विचारले असता मिडियाला सांगितले, ताप गेला ते बरे झाले. शरद पवारांनी असे उत्तर देताच सर्वजण चकीत झाले. मात्र, त्यांनी ताप गेल्याने ते कामाला लागले, असे सूचक उत्तर देऊन पडदा टाकण्याचे काम केले.
दरम्यान, एफडीआय देशासाठी चांगले आहे. त्याचा भविष्यात फायदा होईल, असे सांगत समर्थन केले. एफडीआयसंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेबाबत त्यांना दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
गुजरात मेळाव्यात निवडणुकीला तयार राहा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. याची पुन्हा री शरद पवार यांनी ओढली. ते म्हणालेत, राजकीय पक्षांची कधीही निवडणूक लढण्याची तयारी असायला हवी.