www.24taas.com , झी मीडिया, कोल्हापूर
पुण्याहून परतताना कोल्हापूरच्या श्रुतिका चंदवाणी बरोबर अन्य तिघांचा अपघातात मृत्यू झाला. यातील श्रुतिका ही अव्वल दर्जाची स्केटिंगपट्टू होती. एवढंच नव्हे तर वयाच्या सहाव्या वर्षी श्रुतिका चंदवाणीनं ‘लिंबो स्केटिंग’मध्ये ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला होता. तिच्या जाण्यानं स्केटिंग मधला एक तारा निखळा असल्याचं तिच्या प्रशिक्षकांबरोबर अन्य कोल्हापूरकरांना वाटतंय.
पुण्याहून गोकर्ण, गोव्याच्या सहलीला जाताना चेतन बुच, साहिल कुरेशी आणि प्रणव लेले यांनी श्रुतिका चंदवाणीला कोल्हापूरला सोडून जायचं ठरवलं. त्याप्रमाणं श्रुतिका आणि तिचे मित्र निघाले देखील... पण नियतीच्या मनात काही औरचं होतं... दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा हे सगळे कोल्हापूरच्या दिशेने निघाले...
त्यावेळी श्रुतिकानं आपल्या घरच्यांना येत असल्याचा निरोप दिला. पण दुसरा, तिसरा दिवस उजाडला पण श्रुतिका कोल्हापूराला पोहचलीच नाही... तीचा आणि तिच्या मित्रांचा शोध घेतला तेव्हा ७ नोंव्हेंबरला नीरा नदिच्या पात्रात या चौघाचेही मृतदेह आढळून आले...
लहानपणापासून श्रुतिकाला स्केटिंगची आवड होती. त्यामुळं तिनं वयाच्या चौथ्या वर्षापासून स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम यांच्याकडे स्केटिंगचे धडे गिरवायला सुरवात केली. त्यानंतर पुढं जावून वयाच्या सहाव्या वर्षी तिनं लिंबो स्केटिंगमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. अशा या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यानं अनेकांना धक्का बसला तसाच धक्का प्रशिक्षक महेश कदम यांनाही बसला.
श्रुतिकानं १९९७ साली बाविस मारुती कार खालून स्केटिंग करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, असं करणारी ती जगातील एकमेव खेळाडू होती.
या पुढं लिंबो स्केटिंगचा इतिहास ज्या-ज्या वेळी पाहिला जाईल त्यावेळी श्रुतिकाचं नाव ठळक अक्षरांनी आधोरेखित करावं लागेल, अशा प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटतायेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.