दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन

दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 2, 2013, 08:10 PM IST

www.24taas.com, पुणे
दहावी आणि बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला असून ऑक्टोबरमधील परीक्षेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सोमवारी दिली.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षांसाठी १७ क्रमांकाचा अर्ज भरून बसणाऱ्या बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठीही ऑनलाईन प्रणाली राबवण्यात येणार असून त्यांच्या केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्यामुळे खूप वेळ आणि श्रम वाचणार आहेत. शाळांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार असून विद्यार्थ्यांची बहुतांश माहिती शाळांनीच भरायची आहे. त्यामुळे अर्जामध्ये होणाऱ्या चुकांचे प्रमाण कमी होईल, असे जाधव यांनी सांगितले.
राज्यातील बहुतेक शाळांमध्ये आता संगणक उपलब्ध आहेत. अपवादात्मक परिस्थितीत पायाभूत सुविधा नसलेल्या शाळांमध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.