www.24taas.com, पुणे
एकीकडे अजित पवारांनी बडोद्यातल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दांडी मारली असताना दुसरीकडं त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्येच त्यांना डावलण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
बारामती आणि पिंपरी चिंचवड ही शहरं अजितदादांची ख-या अर्थानं बलस्थानं... नगरपालिका आणि महानगरपालिकेत त्यांचं निर्विवाद वर्चस्व... आमदारही दादांना मानणारेच...पालिकेत तर दादांचा शब्द अंतिम... पण याच महापालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत दादांचं साधं नावही नाही... दादांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला काय, त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचं नाव छापण्याची अडचण त्यांच्या शिलेदारांना वाटू लागलीय...आता याच मुद्द्याचं भांडवल करत शहराध्यक्ष योगेश बेहेल यांनी महापौर मोहिनी लांडेंची ही चूक असल्याचं म्हटलंय. आणि महापौरांनी ही चूक मान्य केल्याचंही त्यांनी म्हंटलंय. मात्र महापौर मोहिनी लांडे यांनी पलटवार करत योगेश बेहल मला भेटलेच नाहीत असा दावा केलाय. आणि बेहेल महापौर असताना तरी त्यांनी अजितदादांचं नाव छापलं होतं का ?असा सवाल त्यांनी केलाय.
दूसरीकडे अनेक नगरसेवकांनीही या घटनेचा निषेध केलाय. काही नगरसेवकांनी तर प्रभाग समिती बैठक रद्द करत विरोध दर्शवलाय. एकूणच निमंत्रण पत्रिकेत अजितदादांचं नाव नसल्यानं पिंपरीतलं राजकारण मात्र ढवळून निघालंय... अंतर्गत वाद तर उफाळून आलेतच पण दादा समर्थकांमध्येही काहीशी भीती निर्माण झालीय.