www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मनसेतर्फे पुढे आणण्याचा मनसे नेत्यांचा विचार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरुन देशाच्या पंतप्रधानपदी पोहचलेल्या नरेंद्र मोदींची वाटचाल मनसे कार्यकत्यांना भुरळ घालतेय. पण मोदींसारखं प्रोजेक्ट करून राज ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं तेवढं सोपं नसल्याचं मत राजकीय वर्तुळात व्यक्त होतंय.
जो करिश्मा नरेंद्र मोदींकडे आहे , तो तर राज ठाकरेंना वारसा हक्कानं मिळालाय. बाळासाहेब ठाकरेंच्या सानिध्यात वाढलेल्या राज ठाकरेंना राजकारणाचं बाळकडू बालवयातच मिळालंय. बाळासाहेबांनी कधीही मुख्यमंत्री होण्याची महत्त्वकांक्षा आपल्या राजकीय आयुष्यात बाळगली नाही, पण राज यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाही. नरेंद्र मोदींचा गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान होण्य़ापर्यंतचा प्रवास मनसेला भुरळ घालू लागलाय.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला असला तरी राज्यात सत्ता स्थापनेची स्वप्न मनसे कार्यकत्यांना पडू लागलीय. त्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून घोषित करण्याची जणू स्पर्धात मनसेत लागलीय. एका मुख्यमंत्रीपासून ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास सोपा नव्हता, त्यामागे मोठी तपश्चर्या होती. पण हे मनसे कार्यकत्यांना कोण समजावणार. राज्यात मोदी होण्यासाठी फक्त करिश्माच कामाचा नाही तर त्यासाठी हवं मजबूत पक्ष संघटन आणि जनतेला पटणारे त्या तोडीचे मुद्दे. या दोन्ही गोष्टींचा पक्षात अभाव असताना राज ठाकरेंना मुख्यमंत्री होणं कठिणच असेल.
राज ठाकरे महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री, या संकल्पनेनं सध्या मनसे कार्यकर्ते हरळून गेलेत. पण या संकल्पनेविषयी नागरिकांमध्ये संमिश्र मत व्यक्त होतंय. लोकसभा निवडणुकीनंतर मनसेची अवस्था रात्र थोडी सोंग फार अशी झालीय. पक्षात नेतेगिरी जास्त आणि कामगिरी कमी अशी परिस्थिती आहे. अशा वातावरणात राज ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असोत वा नसोत सध्याच्या महाराष्टाच्या राजकीय परिस्थितीत बदल होण्याची शक्यता फार कमीच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.