मनसेनं शेवटी ‘घरात’ घुसून राडा केलाच…

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर टीका करताना राज ठाकरेंनी म्हटलं होतं की , आमच्या नादाला लागाल तर घरात घुसून मारू...’ अन् शुक्रवारी रात्री उशिरा मनसेच्या कार्यकर्त्यांनी खरोखरच घरात घुसून ‘राडा’ केला. पण, राष्ट्रवादीच्या नव्हे स्वत:च्याच घरात मनसे कार्यकर्त्यांनी हा राडा केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 9, 2013, 12:57 PM IST

www.24taas.com, ठाणे
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर टीका करताना राज ठाकरेंनी म्हटलं होतं की , आमच्या नादाला लागाल तर घरात घुसून मारू...’ अन् शुक्रवारी रात्री उशिरा मनसेच्या कार्यकर्त्यांनी खरोखरच घरात घुसून ‘राडा’ केला. पण, राष्ट्रवादीच्या नव्हे स्वत:च्याच घरात मनसे कार्यकर्त्यांनी हा राडा केलाय.
ठाण्यातील मनसे नगरसेविका रत्नप्रभा पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे विभाग प्रमुख चंद्रकांत येरुणकर यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा घडलाय. हाणामारीचं निमित्त होतं मनसेच्या वर्धापन दिनाचे होर्डिंग लावण्यातील चढाओढ.

गेल्या वर्षी झालेली ठाणे महापालिकेची निवडणूक चंद्रप्रभा पाटील आणि चंद्रकांत येरुणकर ( प्रभाग क्रमांक २२ )यांनी एकत्र लढवली होती. पाटील यांनी विजय नोंदवला होता. तर , येरुणकरांच्या पदरी पराभव पडला . आपल्या पराभवास पाटील आणि त्यांचे कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा संशय येरुणकर यांच्या मनात असून तेव्हापासून या दोघांमध्ये धुसपूस सुरू होती. ८ मार्चचा महिला दिन आणि ९ तारखेला होणारा मनसेचा वर्धापन दिन याबाबतचे होर्डिंग येरुणकर यांनी राबोडी भागात लावले होते. तिथून घरी परतत असताना मनसेचा शाखा अध्यक्ष गणेश वाळके आणि अन्य कार्यकर्त्यांनी येरुणकर यांना हटकले. त्यातून दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली.

वाळके यांनी हा प्रकार नगरसेविका पाटील यांना सांगितला. त्यानंतर पाटील यांच्या बहिणी संगीता, प्रेमा आणि मुक्ता वैती तसेच, भाचे रणजीत, विशाल, मनोज, भूषण, जय, अरविंद यांनी राबोडी पंचगंगा येथे राहणाऱ्या येरुणकर यांच्या घरावर स्टम्प आणि लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला केला. येरुणकर यांच्या घराचा दरवाजा तोडून आतशिरलेल्या या टोळक्याने येरुणकर यांची वृद्ध आई, भाऊ प्रवीण, मुलगा कल्पेश, आणि पत्नी चैताली यांना मारहाण केल्याची तक्रार येरुणकर यांनी राबोडी पोलिसांकडे नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी या सर्व दहा जणांना अटक केलीय.