www.24taas.com, मुंबई, दिनेश दुखंडे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राला दिलेल्या दीर्घ मुलाखतीमुळे शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली. ज्यांना मनापासून शिवसेनेत यायचं असेल, त्यांचं स्वागतच असल्याचं उद्धवनी म्हटलं आहे. राज यांनी मात्र तातडीनं प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? हा महाराष्ट्राच्या राजकारणातला लोकप्रिय प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राज आणि उद्धव एकत्र येणार का? या प्रश्नावर आम्हा दोघांना एकत्र बसवून विचारा. प्रश्नाचं उत्तर दोघांना एकत्र देऊ द्या. कुणी शिवसेनेसोबत मनापासून येणार असतील, तर त्यांचं स्वागत असेल, असं उत्तर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी परवानगी दिल्यास आपण राज ठाकरेंशी चर्चा करायला तयार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव आणि राज ठाकरेंचे मामा चंदूमामा वैद्य यांनीही दोघां बंधुंना एकत्र आणण्याचे पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे.
उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आमंत्रणावर योग्य वेळी बोलेन, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तूर्तास टाळी देण्याचं टाळलं आहे. एका कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख मिस्किलपणे दादू असा केला. मनसेला महायुतीत घ्यायला रिपाइ नेते रामदास आठवलेंचाही विरोध आहे.. त्यामुळे ही मुलाखत संभाव्य पक्षफुटीवर रामबाण इलाज शोधण्यासाठी तर नाही ना, तसंच नव्यानं संपादकपदाची धुरा घेतल्यानंतर सामना प्रकाशझोतात आणण्याची ही क्लृप्ती तर नाही ना, यासारखे काही सवाल उपस्थित होत आहेत.