दुष्काळात `आयपीएल`वर खर्च करणं पटतं का?- राज

दुष्काळात आयपीएल मॅचेस आयोजित करण्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. त्यात आयपीएलला करमणूक करही माफ केला आहे. हे योग्य आहे का?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 4, 2013, 06:08 PM IST


आज राज ठाकरे यांनी आपल्या `कृष्णकुंज` या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी त्यांना पुण्यात येण्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर दिलं. आपली पुण्यात इतक्यात कुठलीच सभा नसल्याचं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. तसंच दुष्काळामध्ये आयपीएल मॅचेस व्हाव्यात का, असा प्रश्नही पुन्हा विचारला.
दुष्काळात आयपीएल मॅचेस आयोजित करण्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. त्यात आयपीएलला करमणूक करही माफ केला आहे. हे योग्य आहे का? मार्चच्या पहिल्याच आठवड्यात एवढा दुष्काळ आहे. पुढील महिन्यांमध्ये तो वाढत जाईल. अशा काळात आयपीएल मॅचेस खेळवणं योग्य आहे का?
आयपीएल क्रिकेट मॅचेस ही शरद पवारांचीच संकल्पना आहे. या मॅचेसवर प्रचंड खर्च केला जातो. एकीकडे शरद पवारांनी आपल्या पक्षातील भास्कर जाधव यांना शाही विवाहातल्या खर्चाबद्दल समज दिली, एका महापौराला विवाहात वारेमाप खर्च केल्याबद्दल पक्षातून काढून टाकलं जातं, त्यांनीच खर्चिक आयपीएलच्या मॅचेस भरवणं बरोबर आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. अशा दुष्काळी परिस्थितीत आयपीएलच्या मॅचेस होणं सद्सद्विवेकबुद्धीला पटतं का? असंही राज ठाकरेंनी विचारलं.

याचवेळी आमचाही कोळी महोत्सव होता तो आम्ही नोव्हेंबर- डिसेंबरवर ढकलला असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.