www.24taas.com, लंडन
‘मी जर सचिनच्या जागी असतो तर इंग्लंडविरुद्धच्या नागपूर टेस्टनंतर मी रिटायर होण्याचा निर्णय घेतला असता’ असं भारताचा माजी कॅप्टन सौरभ गांगुली यानं म्हटलंय.
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची सततची निराशाजनक फलंदाजी अन् त्याचवेळी सुरू असलेली टीम इंडियाची पराभवाची मालिका पाहता सचिननं रिटायर व्हायला हवं, असं गांगुलीलाही वाटतंय. सचिन आणि गांगुली हे गेले एक तप एकत्र खेळले आहेत. ‘सचिनची निराशाजनक कामगिरी सुरू राहिली तर नागपूर कसोटी सामन्यानंतर सचिनने निवृत्तीचा विचार करायला हवा... मी एक खेळाडू आणि फॅन म्हणून गेले दोन कसोटी सामने अगदी बारकाईने पाहिले आहेत. सचिनला धावा करण्यासाठी कष्ट पडताना दिसलं. त्यानं नक्कीच भारतीय क्रिकेटला मोठं योगदान दिलंय पण त्याला आता रन्स काढण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आता पाहावत नाही. त्यानं आत्तापर्यंत दिलेल्या योगदानामुळेच तो त्याला अजूनही खेळण्याची संधी दिली जातेय. कोलकाता कसोटीत सचिनने ७६ धावांची खेळी केली पण तिच्यावर सचिनचा स्टॅम्प आहे असं वाटत नव्हतं. त्याच कसोटीच्या दुसऱ्या डावात सामना वाचविण्याची गरज असताना त्यानं केवळ पाच रन्स केले. बॅटसमनच्या अपयशामुळे टीम इंडिया कोलकाता सामन्यात तोंडघशी पडली’ असं सौरव गांगुली यानं म्हटलंय.
३ जानेवारी २०१२ नंतर पहिल्यांदाच कोलकाता कसोटीत सचिननं त्याची हाफ सेंन्चुरी पूर्ण केली होती. चार सामन्यांच्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं २-१ अशी आघाडी घेतलीय.