www.24taas.com, रत्नागिरी
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन निर्माण झालेला राजकीय वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचलाय. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी भास्कर जाधवांनाही त्यांच्याच शब्दांत उत्तर दिल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
चिपळूण इथं होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडणुकीतील वाद आता शमला असला तरी स्वागताध्यक्षपदावरुन मात्र कोकणातत्या राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलीय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे दोन मंत्रीच यामध्ये एकमेकांसमोर उभं ठाकल्यानं बाकीचे पक्ष या वादाची मजा लुटण्यात मग्न आहेत. चिपळूणचे रहिवासी आम्ही आणि तिथं होणा-या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान मात्र रायगडच्या तटकरेंच्या वाट्याला. यामुळंच पालकमंत्री भास्कर जाधवांच्या अंगाचा चांगलाच तिळपापड उडाला आणि चार दिवसांपूर्वी त्यांनी सुनील तटकरेंवर बेछूट आरोप केले. तसंच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रमेश कदम यांनाही थेट काव्यातून मुर्खाची उपमा दिली.
भास्कर जाधवांनी एवढी टीका केल्यावर त्याला प्रत्युत्तर आलेच. मग रमेश कदमांनीही आपल्या कोकणी बाण्यानुसार जाधवांची वाळू माफिया अशी संभावना करत गुंडांच्या खांद्यावर साहित्याची पवित्र पालखी कशी द्यायची असा सवाल केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर हत्ती रस्त्यावर जाताना कुत्री भुंकतच असतात. असा टोलाही पालकमंत्री जाधवांना लगावला.
दरवर्षी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं साहित्यिकांच्या वादांतून करमणूक करुन घेणा-या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कानी यावेळी राजकीय वादाचे कवित्वही पडू लागल्यानं त्यांचे चांगलेतच मनोरंजन होतंय. तसंच आपले नेते साहित्यसेवा करण्यासाठी किती धडपडतायत याचाही प्रत्यय येतोय.