www.24taas.com, चिपळूण
चिपळूणमध्ये सुरू असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं. उद्घाटनपर भाषणात पवारांनी साहित्यिकांना कधी चिमटा काढला तर कधी खडेबोल सुनावले.
‘राजकारणात साहित्यिकाचं स्वागत केलं जातं मात्र, संमेलनात राजकारण्यांच्या सहभागावरून वाद घातले जातात... हे अत्यंत चुकीचं आहे’ असं म्हणत पवारांनी साहित्यिकांना चांगलंच धारेवर धरलं. ‘नागनाथ कोत्तापल्लेच यांना अध्याक्षपदासाठी निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत ज्या पातळीवर जाऊन प्रचार करण्या त आला, त्या थराला आम्ही राजकारणीही जात नाही. मुळात कोत्तापल्ले यांच्या साहित्या्तील योगदानावरून त्यांना हे अध्याक्षपद सन्मानानेच मिळायला पाहिजे होते. पुढील काळात संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानानेच द्यावं’ असं पवारांनी म्हटलंय.
यावेळी व्यासपीठाला बाळासाहेबांचं नाव दिल्यावरून झालेला वादही अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. संमेलनाध्यक्ष म्हणून महिलांचं प्रतिनिधित्व अत्यंत गौण असल्याची खंतही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केलीय तर ‘हस्तदंती मनोऱ्यात वावरणाऱ्या आत्मकेंद्री साहित्यिकांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलीय’ असं म्हणत साहित्यिकांना चांगलेच चिमटे काढलेत.
वाचन संस्कृती वाढवण्याची गरज असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलंय तसंच राज्यातल्या गावा-गावांत सुरू असलेली ग्रंथालयं नेमकी कशा स्थितीत आहेत, हे पाहणं गरजेचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.