टीम इंडियाचं नागपूर टेस्टमध्ये पारडं जड

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या नागपूरच्या विदर्भ मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाननं इतिहास घडवलाय. 

Updated: Nov 26, 2015, 07:18 PM IST
टीम इंडियाचं नागपूर टेस्टमध्ये पारडं जड title=

नागपूर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या नागपूरच्या विदर्भ मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाननं इतिहास घडवलाय. पहिल्या डावात अवघ्या ७९ रन्समध्ये दक्षिण आफ्रिकेची अख्खी टीम गारद झालीय. त्यानंतर भारताचा दुसरा डावही १७३ धावांमध्ये गुंडाळला गेला. त्यामुळे भारताने दुसऱ्या डावात ३०० धावांची आघाडी घेतली आहे. आता दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी ३०२ धावांची गरज आहे. 

फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या फिरकी माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले. भारताचा पहिला डाव २१५ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र, अश्विन आणि जडेजाच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव अवघ्या ७९ धावांत आटोपला. अश्विनने पाच तर जडेजाने चार बळी घेत आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. 

LIVE SCORECARD - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (तिसरी टेस्ट) 

पहिल्या दिवसअखेर दोन बाद ११ वरुन खेळताना दुसऱ्या दिवशी आफ्रिकेला केवळ ६८ धावा करता आल्या. त्या मोबदल्यात मात्र पाहुण्यांनी तब्बल आठ विकेटस् गमावल्या. पाहुण्यांच्या संघातील भरवशाच्या फलंदाजांनीही यावेळी साफ निराशा केली. आफ्रिकेकडून जेपी ड्युमिनीने (३५ रन्स) एकटा किल्ला लढवण्यचा प्रयत्न केला. मात्र, त्याला इतर फलंदाजांनी साथ लाभली नाही. त्यामुळे पाहुण्यांच्या संघाला पहिल्या डावात शंभरीही गाठता आली नाही.  तत्पूर्वी, पहिल्या दिवशी भारताने पहिल्या डावात २१५ धावा केल्या होत्या. 

या सामन्यामध्ये, भारतानं दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ११३ वर्षांपूर्वीचा एक लज्जास्पद रेकॉर्डही मोडीत काढलाय. नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १२ धावांत आफ्रिकेने तब्बल पाच गडी गमावले. यापूर्वी १९०२ मध्ये अॉस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेने १४ धावांत पाच गडी गमावले होते. ही त्यांची सगळ्यात खराब कामगिरी होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.