'अविवाहीत महिला बॉक्सर्सनाही प्रेगनन्सी टेस्ट करायला भाग पाडलं'

महिला बॉक्सिंगमध्ये पुन्हा एकदा एक मोठा वाद निर्माण झालाय. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये खेळण्यासाठी जाणाऱ्या आठ महिला बॉक्सर्सची गर्भपरिक्षा चाचणी (प्रेगनन्सी टेस्ट) करण्यात आलीय.

Updated: Nov 6, 2014, 12:08 PM IST
'अविवाहीत महिला बॉक्सर्सनाही प्रेगनन्सी टेस्ट करायला भाग पाडलं' title=

नवी दिल्ली : महिला बॉक्सिंगमध्ये पुन्हा एकदा एक मोठा वाद निर्माण झालाय. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये खेळण्यासाठी जाणाऱ्या आठ महिला बॉक्सर्सची गर्भपरिक्षा चाचणी (प्रेगनन्सी टेस्ट) करण्यात आलीय.

याच मुद्यावरून बॉक्सिंग इंडिया वादात सापडलीय. महत्त्वाचं म्हणजे अविवाहीत महिलांची प्रेग्नन्सी टेस्ट करणं नियमांविरुद्ध आहे. 

कोरियातल्या ‘जेजू’मध्ये १३ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या चॅम्पियनशीपसाठी १० महिला बॉक्सर्सची निवड करण्यात आलीय. यातील आठ महिलांची गर्भपरिक्षा चाचणी दिल्लीतल्या एका खाजगी लॅबमध्ये करण्यात आली. 

धक्कादायक म्हणजे, यावर स्पष्टीकरण देताना बॉक्सिंग इंडियानं ‘असं काही पहिल्यांदाच घडलेलं नाही... यापूर्वी अनेकदा महिला बॉक्सर्सची प्रेगनन्सी टेस्ट कराव्या लागल्यात’ असं म्हटलंय... आणि त्याहूनही धक्कादायक आहे की ‘साइ’नं एकदाही अशा प्रकारच्या प्रेगनन्सी टेस्टला विरोध केलेला नाही.

पण, ‘साइ’चे सल्लागार डॉ. पीएसएम चंद्रन यांनी या गर्भपरिक्षणावर टीका केलीय तसंच हे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारतीय खेळ मेडसिन महासंघाचे अध्यक्ष डॉ. चंद्रन यांच्या म्हणण्यानुसार, बॉक्सिंग इंडियाच्या सांगण्यावरून साइनं हे परिक्षण केले.

या महिला बॉक्सर्सना गर्भपरिक्षण अनिवार्य केलं गेलं... त्याना आदेश दिले आणि साइनंही ते निमूटपणे पाळले. हे गर्भ परिक्षण आठ तरुण अविवाहीत तरुणींवर केले गेले. यामध्ये काही ज्युनिअर खेळाडुंचाही समावेश आहे आणि हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. नियमांच्या विरुद्ध जाऊन हे परिक्षण करण्यात आलं, असं चंद्रन यांनी म्हटलंय. 

बॉक्सिंग इंडियाचे सचिव जय कोवली यांना याबद्दल विचारण्यात आल्यानंतर आपल्याला असे कोणतेही नियम ठावूक नसल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलंय. चंद्रन यांनी केलेल्या मागणीनुसार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगानं पुढे येऊन यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे. यामुळे, मुलींनी पुढे येऊन खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळू शकेल आणि त्यांच्या अधिकारांची, त्यांच्या मर्यादांचं संरक्षण केलं जाऊ शकेल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.