मुंबई : भारत पाकिस्तान सामन्यावेळी देश जितका उत्साही असतो तितका कदाचितच इतर कोणत्या सामन्यावेळी असतो. पण, आता टी-२० विश्वचषकात होणारा भारत - पाकिस्तान सामना मात्र धर्मसंकटात सापडला आहे. म्हणजे हा सामना कोलकत्यात तर पार पडेल, पण तो तुम्हा आम्हाला पाहता येईल की नाही यावर शंका आहे.
कारण, दरवर्षी मार्च महिन्यात एका दिवशी 'अर्थ अवर डे' साजरा केला जातो. ज्यात पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी जगातील १७२ देशांत संध्याकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान आपापल्या घरातील विजेचे दिवे बंद केले जातात. या देशांमध्ये भारताचाही समावेश होतो.
यंदा 'अर्थ अवर डे' १९ मार्चला साजरा केला जाणार आहे. पण, त्याच दिवशी भारत पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याच्या प्रसारणाला सुरुवात होईल. पण, सामन्यादरम्यानच हा अर्थ अवर पाळला जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची काळजी करणारे पण भारत पाकिस्तान सामन्यासाठी उत्सुक असणारे हा सामना पाहणार की नाही याविषयी शंका आहे.
पण, आता अमिताभ बच्चन यांनी शक्कल लढवून यावर उपाय सुचवलाय. लोकांनी एकत्र येऊन एकाच स्क्रीनवर हा सामना पाहावा असं त्यांनी म्हटलंय. आता असा एकत्र येऊन हा सामना पाहिला तर वीजही वाचेल आणि सामन्याची रंगतही वाढेल.
T 2176 - Support #EarthHour2016, watch #IndVSPak with friends on one screen, join campaign #TogethervsClimateChange https://t.co/dd0AbCOZXa
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 16, 2016