बंगळुरु : भारतीय क्रिकेट संघातील लेगस्पिनर अमित मिश्रा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बंगळुरच्या अशोक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.
बंगळुर पोलिसांनी त्याच्याविरोधात समन्स बजावलं असून, सात दिवसांत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अमित मिश्रा सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळत आहे.
मिश्रा आणि तक्रारदार मुलीची चार ते पाच वर्षांपासून ओळख आहे आणि ते सातत्याने भेटतही होते. गेल्या महिन्यात मिश्रा येथे क्रिकेट कॅम्पसाठी आला तेव्हा ही मैत्रिण त्याला भेटायला येथील एका हॉटेलमध्ये गेली होती. ती त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा तो उपस्थित नव्हता. तो परत आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी मिश्राने आपला विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटलेय.
पोलिसांनी मिश्राला नोटीस बजावली आहे. त्याला चौकशीसाठी पाचारण केले आहे. तसेच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदविले असून, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही मिळविले आहेत. तसेच याबाबत बीसीसीआयला देखील माहिती देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
महिलेच्या तक्रारीवरून मिश्राविरुद्ध भांदविच्या ३५४ आणि ३२८ कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.