सेंट जोन्स : वेस्ट इंडिजच्या टीमनं डॅरेन सॅमीच्या नेतृत्वात 2012 आणि 2016 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या विश्वविजेत्या टीमच्या कॅप्टनला वेस्ट इंडिज बोर्डानं डच्चू दिला आहे. डॅरेन सॅमीला कॅप्टनशीप आणि टीममधून काढून टाकण्यात आलं आहे. निवड समितीच्या अध्यक्षांनी मला फोन केला, 30 सेंकद चाललेल्या या संभाषणामध्ये मला टीममधून काढून टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं, असा दावा सॅमीनं केला आहे.
डॅरेन सॅमीनं त्याच्या फेसबूक पेजवर याबाबतचा एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सहा वर्षांचा कॅप्टनशीपचा माझा कार्यकाळ आता संपला आहे, असं सॅमी या व्हिडिओत म्हणाला आहे.
माझी कामगिरी टीममध्ये निवड व्हायच्या लायकीची नाही, असं अध्यक्षांनी सांगितल्याची प्रतिक्रियाही सॅमीनं दिली आहे. सॅमीच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजनं 2012 ला श्रीलंकेत आणि 2016 मध्ये भारतात टी 20 वर्ल्ड कप जिंकला. दोन टी 20 वर्ल्ड कप जिंकणारा सॅमी हा एकमेव कॅप्टन आहे.
2016चा टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सॅमीनं वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर टीका केली होती. ही टीका केल्यामुळे सॅमीला डच्चू दिल्याचं बोललं जात आहे.