म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये

2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत.

Updated: Jun 2, 2016, 10:54 PM IST
म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये title=

दुबई : 2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत. आयसीसीच्या टुर्नामेंटमध्ये भारत पाकिस्तान या दोन्ही टीम एकाच ग्रुपमध्ये ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो असं वक्तव्य आयसीसीचे मुख्य अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले होते. रिचर्डसन यांच्या या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. 

भारत-पाकिस्तानमधल्या सामन्यांमुळे आयसीसीला मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात, म्हणून आयसीसी ग्रुपमधल्या टीम फिक्स करते असा आरोप रिचर्डसन यांच्या वक्तव्यानं काढला गेला होता. या मुद्द्यावर आता खुद्द आयसीसीलाच स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. 

भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असावे यासाठी जाणूनबुजून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. 30 सप्टेंबर 2015 साली आयसीसीच्या वनडे रॅकिंगमध्ये असलेल्या टॉप 8 टीमचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये समावेश करण्यात आला, असं आयसीसीनं सांगितलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतले दोन्ही ग्रुप तुल्यबळ करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

हे सांगतांना आयसीसीनं आकड्यांचा दाखला दिला आहे. 30 सप्टेंबर 2015 ला ऑस्ट्रेलिया(1), न्यूझिलंड(4), इंग्लंड(6) आणि बांग्लादेश(7) नंबरवर होतं. या चारही संघांच्या रॅकिंगची बेरीज केली तर 1+4+6+7 म्हणजेच 18 एवढी येते, म्हणून या टीम ग्रुप ए मध्ये आहेत. 

तर ग्रुप बीमध्ये असणाऱ्या टीमपैकी भारत(2), दक्षिण आफ्रिका(3), श्रीलंका(5) आणि पाकिस्तान(8) नंबरवर होती. याचीही बेरीज केली तरी 2+3+5+8 म्हणजेच 18 इतकी येते, म्हणून असे ग्रुप पाडण्यात आल्याचं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे. 

2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये 4 जूनला इंग्लंडच्या एजबॅस्टन मैदानामध्ये सामना होणार आहे.