कराची : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि तहरिक - ए - इंसाफ पक्षाचा प्रमुख इमरान खान याचा दुसरी पत्नी रेहम खान हिच्याशी घटस्फोट झालाय. इमरान-रेहम यांच वैवाहिक जीवन 10 महिन्यांतच संपुष्टात आलंय.
63 वर्षीय इमराननं 42 वर्षीय बीबीसीची माजी अँकर रेहम हिच्यासोबत यावर्षी जानेवारी महिन्यात विवाह केला होता. हे इमरानं आणि रेहम या दोघांचंही हे दुसरं लग्न होतं.
रेहम हिला पहिल्या लग्नापासून तीन मुलं आहेत. रेहम आणि आपला तलाक झाल्याच्या वृत्ताला खुद्द इमराननं दुजोरा दिलाय. दोघांनी सामंजस्यानं हा घटस्फोट घेतल्याचं त्यानं म्हटलंय. तसंच हा खूप भावनिक आणि गंभीर मुद्दा असल्यानं मीडियानं चर्चा टाळण्याचं आवाहन इमराननं केलंय.
जेमिमा गोल्डस्मिथ हिच्यासोबत इमराननं पहिलं लग्न केलं होतं. दोघांचा संसार जवळपास नऊ वर्ष टिकला. तर रेहम हिनं इजाज रेहमान यांच्याशी पहिला विवाह केला होता.
रेहम हिनं राजनीतिमध्ये प्रवेश केल्यानं आणि गरजेपेक्षा अधिक रुची दाखवल्यानं इमरान नाराज असल्याचं वृत्त पाकिस्तान मीडियानं आधीच दिलं होतं. यामुळे, सप्टेंबर महिन्यात या दोघांमध्ये सगळं काही ठिक नसल्याचं मीडियामध्ये येत होतं.
शिवाय, इमरान हे माजी पत्नी जेमिमा आणि मुलांची इंग्लंडमध्ये जाऊन भेट घेत असल्याचंही सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.