धरमशाला : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपत आली असली तरी क्रिकेटपटूंमधील शाब्दिक चकमकी काही थांबण्याचे नाव घेत नाहीये.
चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेड यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
तिसऱ्या दिवशीच्या पहिल्याच चेंडूवर जोश हेझलवूडने जडेजा बाद असल्याचे अपील केले. अंपायरनेही बाद असा निर्णय दिला मात्र डीआरएसचा निर्णय़ जडेजाच्या बाजूने लागला.
हळूहळू वृद्धिमन साहा आणि जडेजा ऑस्ट्रेलियावर भारी पडत होते. यामुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चिंतेत होते. यावेळी जडेजाचे लक्ष विचलित करण्यासाठी मॅथ्यू वेडने शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर अंपायरने या वादाची दखल घेत प्रकरण संपवले.
त्यानंतर आक्रमक झालेल्या जडेजाने कसोटी क्रिकेटमधील 7वे अर्धशतक ठोकले.त्यानंतर त्याने तलवारबाजी करुन अर्धशतकाचे सेलिब्रेशन केले आणि अर्धशतकांच्या आनंदात वेडला कडक शब्दात प्रत्युत्तर दिले.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही वेड आणि जडेजा यांच्यात वाद झाला. ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर ही घटना घडली. 33व्या षटकात जेव्हा मॅक्सवेलला अंपायरने बाद ठरवले तेव्हा मॅक्सवेलने लगेचच डीआरएस घेतला मात्र हा निर्णय़ मॅक्सवेलच्या विरुद्ध लागला. यावेळी रागात वेडने भारतीय खेळाडूंसह हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला मात्र अश्विनने मध्यस्थी केली आणि वाद मिटवला.