आफ्रिदीनं नको तिकडे खुपसलं नाक

भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटलाही बसला आहे.

Updated: Feb 27, 2016, 01:24 PM IST
आफ्रिदीनं नको तिकडे खुपसलं नाक title=

मीरपूर: भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. या दोन्ही देशांमध्ये आयसीसीच्या टुर्नामेंट सोडल्या तर मॅच होत नाहीत, पण या सगळ्या प्रकरणावर पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीनं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

भारत सरकार क्रिकेट आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी एकत्र करत आहे, पाकिस्तानचं सरकार मात्र कधी असं करत नाही, अशी मुक्ताफळं त्यानं उधळली आहेत.

भारत आणि पाकिस्तानमधल्या नागरिकांना या दोन्ही देशांमधले क्रिकेट सामने बघायचे आहेत, त्यामुळे दोन्ही देशाच्या सरकारनी जनभावना लक्षात घ्यावी, पाकिस्तान सरकार ते लक्षात घेतं आणि प्रत्येक वेळी त्या दिशेनं पाऊल टाकतं, असं आफ्रिदी म्हणाला आहे. भारत सरकारनंही तसंच करावं असा फुकटचा सल्ला द्यायलाही आफ्रिदी विसरला नाही.

मागच्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होणार होती, पण सीमारेषेवर ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे ही मालिका होऊ शकली नाही. यामुळे नाराज झालेल्या पाकिस्ताननं भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याची धमकीही दिली होती.