वर्ल्डकप विजेत्या टीममधील खेळाडूचा बुकींशी संबंध - मुदगल समिती

वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकी आणि फिक्सिंग करणाऱ्यांशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीनं सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे. या खेळाडूचं नावं अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसून या अहवालाविषयी १० नोव्हेंबररोजी होणाऱ्या सुनावणीत हे नाव समोर येण्याची चिन्हं आहेत. 

Updated: Nov 4, 2014, 12:08 PM IST
वर्ल्डकप विजेत्या टीममधील खेळाडूचा बुकींशी संबंध - मुदगल समिती title=

मुंबई: वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे बुकी आणि फिक्सिंग करणाऱ्यांशी संबंध होते असा गौप्यस्फोट आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीनं सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर सादर केलेल्या अहवालात केला आहे. या खेळाडूचं नावं अद्याप स्पष्ट होऊ शकलं नसून या अहवालाविषयी १० नोव्हेंबररोजी होणाऱ्या सुनावणीत हे नाव समोर येण्याची चिन्हं आहेत. 

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टानं मुदगल समितीची नेमणूक केली होती. या समितीनं सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर लिफाफ्यात अंतिम अहवाल सादर केला. या अहवालात समितीनं वर्ल्डकप विजेत्या संघातील एका भारतीय खेळाडूचे बुकींशी संबंध असल्याचं म्हटलं आहे.  हा खेळाडू आता भारतीय संघाचा भाग नाही. तीन वर्षांपूर्वी एका फसलेल्या 'फिक्सिंग'चा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. याशिवाय बेटिंगप्रकरणात गुरुनाथ मयप्पन आणि अभिनेता बिंदू दारा सिंह यांच्यामधील संभाषणातील आवाजही त्यांचेच असल्याचं स्पष्ट झाल्यानं मयप्पन आणि त्यांचे सासरे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  

अहवाल तयार करताना चौकशी समितीनं चेन्नई सुपर किंग्जमधील खेळाडूंची चौकशी करुन मयप्पन, एन. श्रीनिवासन यांचा संघातील हस्तक्षेपाविषयी माहिती जाणून घेतली. या अहवालातील गोपनीयता उघड होऊ नये म्हणून समितीनं खेळाडूंचं नाव जाहीर करण्याऐवजी त्यांना विशिष्ट क्रमांक दिला आहे. तर खेळाडूंना दिलेल्या विशिष्ट क्रमांकाची यादी संबंधीत न्यायाधीशांनाच दिली जाणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.