नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझा नेहमीच अग्रेसिव्ह दिसतो. मात्र रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान मोर्तझा भावूक झालेला पाहायला मिळाला.
याचे कारण म्हणजे बांगलादेशचे दोन गोलंदाज तस्कीन अहमद आणि अराफत सनी यांच्यावर घालण्यात आलेली बंदी. या दोनही गोलंदाजांची शैली संशयास्पद आढळल्याने आयसीसीकडून यांचे निलंबन करण्यात आलेय. ऐन वर्ल्डकपदरम्यान या दोघांचे निलंबन कऱण्यात आल्याने बांगलादेश संघाला मोठा धक्का बसलाय.
रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान मोर्तझाला या दोनही गोलंदाजांवर घातलेल्या बंदीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मोर्तझाला आपल्या भावना अनावर झाल्या. मी माझ्या करियरबाबत जास्त विचार करत नाही मात्र या स्थितीत मी माझ्या सहकाऱ्यांना साथ दिली नाही तर मी कर्णधार काय कामाचा, असे मोर्तझा म्हणाला. त्यांच्या निलंबनामुळे संघाचे नक्कीच मोठे नुकसान झालेय. मात्र या स्थितीत संघातील खेळाडूंना शांत राखण्याचा प्रयत्न करतोय. बांगलादेशचा आज ऑस्ट्रेलियाशी सामना होतोय. दोन्ही संघासाठी आज करो वा मरो अशी स्थिती आहे.