नॉटिंगहॅम : अॅशेस मालिका गमाविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क ही मालिका संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. २० ते २४ ऑगस्टदरम्यान ओव्हलवर होणारी पाचवी कसोटी क्लार्कच्या कारकीर्दीतील शेवटची कसोटी असेल.
अत्यंत प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेत १-२ नं पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाला नॉटिंगहॅम कसोटीत बरोबरीची संधी होती. पण, पहिल्याच दिवशी स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे क्लार्क कंपनीनं सपशेल नांगी टाकली आणि अवघ्या ६० धावांत जगज्जेती ऑस्ट्रेलिया गारद झाली.
अॅशेसमधील ही ढिसाळ कामगिरी ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या जिव्हारी लागली. टीम ऑस्ट्रेलियावर सडकून टीका झाली. क्लार्कसाठी हे दुःस्वप्नच होतं. तरीही, 'मी निवृत्त होणार नाही', अशी गर्जना त्यानं केली होती. पण आज एकाएकी क्लार्ककडून निवृत्तीचे संकेत आल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. या 'भीषण' अॅशेस मालिकेसोबतच क्लार्कची 'भूषणावह' कारकीर्द संपणार आहे. त्यामुळे तो निवृत्त होतोय, की त्याला निवृत्त करताहेत, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्यानं वनडे कारकीर्दीला राम-राम केला. टी-२० तून तर त्यानं २०११ मध्येच निवृत्ती घेतली होती आणि आता ११५ वी कसोटी खेळून क्लार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.