मुंबई : टीम इंडियातील आघाडीचा फलंदाज सुरेश रैना याला सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, ही विश्रांती आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यामुळे मिळल्याचे पुढे आले आहे. मोदींच्या ई-मेलमुळे त्याला टीममधून वगळण्यात आले आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली. तसेच रैनालाही. रैनाला कर्णधारपद तर नाहीच, पण सक्तीची विश्रांती घ्यावी लागली ती आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदीच्या ई-मेलमुळे. कारण मोदी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) लिहिलेल्या सट्टेबाजीशी निगडित पत्रामध्ये रैनाचे नाव होते. त्यामुळेच रैनाला विश्रांती देऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कर्णधारपद मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे सोपविले.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठीचा संघ २९ जूनला निवडण्यात येणार होता. पण त्याच्या दोन दिवसांपूर्वीच मोदीने आयसीसीला पत्र लिहिले आणि त्याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. निवड समितीला रैनालाच झिम्बाब्वे दौऱ्यावर कर्णधार म्हणून पाठवायचे होते. पण या पत्रामुळे त्यांना निर्णय बदलावा लागला, ही माहिती पुढे आली आहे.
रैनाने एक पत्रक काढत आरोपांचे खंडन केले होते. जगभरातील माझ्या चाहत्यांना मी सांगू इच्छितो की मी नेहमीच खेळभावनेने खेळत आलो आहे. कोणत्याही गैरप्रकारामध्ये मी कधीही सहभागी नव्हतो. माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत. क्रिकेट माझ्यासाठी सर्वस्व आहे. या पत्राबाबत योग्य ते पाऊल मी उचलणार आहे, असे रैनाने म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.