मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या या मोसमामध्ये विजयाची हॅट्रिक केली आहे. 

Updated: Apr 14, 2017, 07:46 PM IST
मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक! title=

बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या या मोसमामध्ये विजयाची हॅट्रिक केली आहे. मुंबईनं आरसीबीचा ४ विकेट आणि ७ बॉल राखून पराभव केला आहे.

१४३ रन्सचा पाठलाग करताना मुंबईची अवस्था अत्यंत वाईट झाली. स्कोअरबोर्डवर फक्त ७ रन्स असताना मुंबईचे ४ बॅट्समन तर ३३ रन्सवर ५ बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परत गेले होते. पण कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्याच्या पार्टनरशीपमुळे मुंबईचा विजय झाला.

कायरन पोलार्डनं ४७ बॉलमध्ये ७० रन्स आणि कृणाल पांड्यानं ३० बॉलमध्ये ३७ रन्स केल्या. आरसीबीकडून पहिलीच मॅच खेळणाऱ्या सॅम्युअल बद्रीनं यंदाच्या आयपीएलमधली पहिलीच हॅट्रिक घेतली. तरीही आरसीबीचा पराभव झाला.

याआधी रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅचला मुकलेल्या विराट कोहलीनं या मॅचमध्ये जोरदार कमबॅक केलं. विराटनं ४७ बॉलमध्ये६२ रन्स केल्या पण आरसीबीच्या दुसऱ्या कोणत्याच बॅट्समनला फारसं यश मिळालं नाही.

चार पैकी तीन मॅच जिंकल्यामुळे मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबईकडे सध्या सहा पॉईंट्स आहेत.