'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

‘एमसीए’च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलचा शरद पवारांच्या बाळ महाडदळकर पॅनलशी मुकाबला या निवडणुकीत रंगणार आहे. पाटील यांच्या पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यामुळे या निवडणुकीतली चुरस वाढलीय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार महाडदळकर पॅनलचे समर्थक मानले जातात. या गटाकडून शेलार यांनी अर्ज भरल्यास शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप अशी ही लढत होईल. तर रिपाइंचे रामदास आठवलेही उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे ‘एमसीए'ची निवडणूक हा राजकीय आखाडा बनल्याचं चित्र आहे.

Updated: Jun 9, 2015, 12:51 PM IST
'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस title=

मुंबई : ‘एमसीए’च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलचा शरद पवारांच्या बाळ महाडदळकर पॅनलशी मुकाबला या निवडणुकीत रंगणार आहे. पाटील यांच्या पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यामुळे या निवडणुकीतली चुरस वाढलीय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार महाडदळकर पॅनलचे समर्थक मानले जातात. या गटाकडून शेलार यांनी अर्ज भरल्यास शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप अशी ही लढत होईल. तर रिपाइंचे रामदास आठवलेही उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे ‘एमसीए'ची निवडणूक हा राजकीय आखाडा बनल्याचं चित्र आहे.

'एमसीए'ची पॉलिटिकल धुमाळी... 
महाराष्ट्रात राजकीय निवडणुकांचा हंगाम ओसरला असला तरी, एका निवडणुकीच्या चाहुलीनं राजकीय नेत्यांच्या आशा पु्न्हा पल्लवित झाल्यात. निमित्त आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणूक... 

17 जूनला होऊ घातलेल्या हया निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना पुन्हा एकदा शह-काटशह देण्याची संधी मिळालीय. बीसीसीआय आणि आयसीसीचं अध्यक्षपद भूषविलेले शरद पवार महाडदळकर गटाच्या पाठिंब्यानं पुन्हा निवडणूक लढविण्याची चिन्ह आहेत. या गटाकडून उपाध्यक्षपदासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ऍडव्होकेट आशीष शेलार यांचं नाव चर्चेत आहे... महाड़दळकर गटाचे विरोधी विजय पाटील यांच्या क्रिकेट फस्ट पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केलाय. शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार प्रताप सरनाईक हे या पॅनलमध्ये असणार आहेत. उद्धव ठाकरे मुंबईत परतल्यानंतर याची अधिकृत घोषणा होईल. शिवसेनेनं मित्रपक्ष भाजपला इथंही आव्हान देण्याची तयारी केलीय.

एमसीए निवडणुकीसाठी 9 जूनला उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया पार पडेल, तर 11 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 

या निवडणुकीत 329 मतदार आहेत. यातले अनेक जण राजकीय नेते आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पारसी पोयोनिअर जिमखान्याचं प्रतिनिधित्व करतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र  आव्हाड, सचिन अहिर आणि प्रसाद  लाड  हे नेतेही एमसीए अंतर्गत क्लबचे मालक आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मेरी क्रिकेटर्स क्लबचे नेते आहेत तर त्यांच्या पक्षाचे राहुल शेवाळे, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई हे मातब्बर नेते क्रिकेटच्या मैदानातही बॅटिंग करतात.

दोन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे काँग्रेसचे शिलेदार आहेत. चव्हाण माझगाव क्रिकेट क्लब आणि राणे इलेव्हन सेव्हनटी सेव्हन क्लबचं प्रतिनिधित्व करतात.

भाजपचे आशीष शेलार राजस्थान सीसी क्लबकडून आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले सिद्धार्थ कॉलेजकडून रिंगणात असतील.

नितीन सरदेसाई आणि अजिंक्य नाईक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा क्रिकेटमधला चेहरा आहेत तर वसई विरारच्या बहुजन विकास आघाडीचे पंकज ठाकूरही एका क्लबचं प्रतिनिधित्व करतात. 

आता इतकी नेतेमंडळी असल्यावर क्रिकेट पिचचा राजकीय आखाडा नाही झाला, तरच नवल... पण यामुळे क्रिकेटचं किती भलं होणार, हा संशोधनाचाच विषय आहे.
  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.