रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सचा गोल्डन प्रवास सुरुच आहे. मंगळवारी फेल्प्सने आणखी दोन सुवर्णपदके आपल्या नावावर केलीत. आतापर्यंत फेल्प्सच्या नावावर ऑलिम्पिकमध्ये २१ सुवर्णपदकांची नोंद झाली आहे. हा एक विक्रम आहे.
२१ सुवर्णपदकांची कमाई करणार्या अमेरिकन अॅथलेटसच्या अंगावर दिसत असलेले गोल काळेनिळे डाग सध्या कुतुहलाचा विषय झाले आहेत. असे डाग अंगावर असलेल्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डागण्या दिलेल्यासारखे दिसणारे डाग हे मारहाणीचे नाहीत. तसेच ते दुखापतीचे नाहीत. हे डाग आहेत कपिंग थेरपीचे. या थेरपीमुळे अमेरिकन खेळाडूंचा उत्साह प्रचंढ वाढला असल्याची चर्चा सुरू आहे.
कपिंग थेरपी ही प्राचीन चिनी थेरपी असून ते हिलिंग टेक्निक आहे. यामुळे खेळाडूच्या शरीरातील वेदना दूर होतातच पण त्याला रिलॅक्स आणि रिफ्रेशही वाटते. परिणामी खेळात त्यांची कामगिरी उंचावते आहे.
- विशेष प्रकारचे ग्लास अथवा प्लॅस्टीकचे कप वेदना असलेल्या अथवा ताणले गेलेल्या स्नायूंवर बसविले जातात.
- व्हॅक्युम पंपाच्या सहाय्याने कपातील हवा खेचून घेतली जाते.
- यामुळे त्वचा कपात ओढली जाते आणि त्वचेखालच्या स्नायूंना ताण बसतो.
- काही मिनिटाच्या या क्रियेत स्नायूमधील अनेक बारीक रक्तवाहिन्या फुटतात आणि कपाच्या आकाराचा गोल काळानिळा डाग त्वचेवर दिसतो.
- यंदाच्या स्पर्धत अमेरिकन जिमनॅस्टही ही थेरपी वापरत आहेत.
- या थेरपीमुळे थकलेल्या स्नायूंना विश्रांती मिळतेच आणि झालेल्या दुखापती, जखमाही लवकरच भरून येतात असा अनुभव हे खेळाडू सांगत आहेत.