मुंबई : भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. पुढील 10 ते 12 आठवड्यासाठी रोहित क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाहीये.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, रोहितच्या डाव्या मांडीवर शस्त्रक्रिया झाल्यास तो पुढील तीन महिने खेळू शकत नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात रोहितला दुखापत झाली होती.
रोहित या दुखापतीच्या तपासणीसाठी पुढील आठवड्यात लंडनला जातोय. यादरम्यान त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील 10 ते 12 आठवडे तो खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटलेय.
शुक्रवारी रोहितने सांगितले की, जर डॉक्टरांनी माझ्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला तर कमीत कमी तीन महिने मी खेळू शकणार नाही. मला नाही माहित मी किती वेळ मैदानाबाहेर असणार आहे. मात्र आम्ही बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या डॉक्टरांशी संपर्कात आहोत. आतापर्यंत जे रिपोर्ट्स आले ते डॉक्टरांकडे पाठवण्यात आलेत. त्यानंतरच शस्त्रक्रिया करायची ही नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.