दोन महिन्यांची गरोदर सेरेना खेळली आणि जिंकलीही!

गुड न्यूज. ती खेळली. ती जिंकली आणि तिने स्टेफी ग्राफच्या रेकॉर्डशी बरोबरीही केली. सेरेनानं बहीण व्हिनसला पराभूत केलं आणि 23 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या स्टेफीच्या विक्रमाची बरोबरी केली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 20, 2017, 01:46 PM IST
दोन महिन्यांची गरोदर सेरेना खेळली आणि जिंकलीही! title=

मुंबई : गुड न्यूज. ती खेळली. ती जिंकली आणि तिने स्टेफी ग्राफच्या रेकॉर्डशी बरोबरीही केली. सेरेनानं बहीण व्हिनसला पराभूत केलं आणि 23 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या स्टेफीच्या विक्रमाची बरोबरी केली. 

सेरेना मुळातच झुंजार. टेनिस जगताची सम्राज्ञी. पण तिचा हा 29 जानेवारी 2017 चा ऑस्ट्रेलियन ओपनचा विजय खास होता.  सेरेना त्यावेळी चक्क दोन महिन्यांची गरोदर होती. तरीही ती त्याच जिद्दीनं आणि निकरानं खेळली. सेरेना गरोदर असेल, असं त्यावेळी कुणालाही वाटलं नव्हतं. पण बुधवारी सेरेनानं स्नॅपचॅटवर एक सेल्फी अपलोड केला. त्यात ती गरोदर दिसत होती.

मग लगेचच ती गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आणि काही तासांतच सेरेनानं तो सेल्फी डिलीट केला. त्यानंतर काही वेळातच सेरेना गरोदर असल्याचं तिच्या प्रवक्तीनं जाहीर केलं. सध्या सेरेना पाच महिन्यांची गरोदर आहे. 35 वर्षांच्या सेरेना अलेक्सिस ओहानियनशी साखरपुडा झालाय.

आता ऑगस्टमध्ये या दोघांचं बाळ जन्माला येणार आहे. टेनिस हा शारिरीक क्षमतेचा कस लावणारा खेळ. तरीही सेरेना दोन महिन्यांची गरोदर असताना जिंकली. सध्या टेनिसमधल्या जागतिक क्रमवारीत सेरेना अव्वल आहे. आणि या शिखरावर असतानाच ती आनंदाचं दुसरं शिखरही गाठणार आहे. ती आई ही होणार आहे.