टेनिसस्टार मारिया शारापोव्हा डोपिंग टेस्टमध्ये फेल

टेनिस जगतातील माजी नंबर वन ऱशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हाने धक्कादायक खुलासा केलाय. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान डोपिंग टेस्टमध्ये आपण फेल झाले होते अशी माहिती खुद्द शारापोव्हाने दिलीय. 

Updated: Mar 8, 2016, 08:44 AM IST
टेनिसस्टार मारिया शारापोव्हा डोपिंग टेस्टमध्ये फेल title=

लॉस एंजेलिस : टेनिस जगतातील माजी नंबर वन ऱशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हाने धक्कादायक खुलासा केलाय. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान डोपिंग टेस्टमध्ये आपण फेल झाले होते अशी माहिती खुद्द शारापोव्हाने दिलीय. 

२८ वर्षीय शारापोव्हा गेल्या १० वर्षांपासून मेल्डोनियम नावाचे औषध घेत होती. मात्र या औषधावर एक जानेवारीपासून अँटी डोपिंग एजन्सीने बंदी घातलीये. ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान करण्यात आलेल्या चाचणीत शारापोव्हाच्या वैद्यकीय अहवालात ती बंदी घातलेले औषध घेत असल्याचे आढळले होते. याप्रकरणी शारापोव्हावर एक वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक बंदी लागू शकते. 

लॉस एंजेलिस येथे पत्रकार परिषदेदरम्यान शारापोव्हाने हा खुलासा केला. मला इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनकडून पत्र मिळाले होते. या पत्रात मी डोपिंग टेस्टमध्ये फेल झाल्याचे लिहिले होते. मी याची पूर्ण जबाबदारी घेते, असे शारापोव्हाने यावेळी सांगितले. 

गेल्या दहा वर्षांपासून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी मिल्ड्रोनेट नावाचे औषध घेतेय. या औषधाला मेल्डोनियममही म्हणतात जे मला माहीत नव्हते. एक जानेवारीपासून या औषधाला बंदी घातलेल्या औषधांच्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले, असेही पाच वेळा ग्रँडस्लॅम विजेती शारापोव्हा म्हणाली. 

मेल्डोनियम औषधाचा वापर छातीत दुखणे तसेच हार्ट अॅटॅकवर केला जातो. मात्र काही शोधकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधामुळे खेळाडूंच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होतो.