कोलकता: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सगळ्या क्रिकेटविश्वाच लक्ष लागून राहिलं आहे ती मॅच म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. कोलकत्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन स्टेडियमवर ही मॅच होत आहे.
पण या मॅचच्याआधी विराट कोहलीनं त्याची स्वत:ची बॅट पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरला गिफ्ट दिली आहे. इडन गार्डनवर सुरु असलेल्या प्रॅक्टिस सेशनवेळी कोहली आला आणि अचानक त्यानं आपली बॅट मोहम्मद आमिरला दिली.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी शिक्षा भोगून आल्यानंतर आमिरवर त्याच्याच संघातले सहकारी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंकडून अनेक टोमणे ऐकावे लागले. पण कोहलीनं मात्र आमिरचं खुल्या दिलानं स्वागत केलं आहे.
या दोघांमध्ये नुकताच आशिया कपमध्ये झालेला संघर्ष कोणाही विसरू शकणार नाही. या मॅचमध्ये आमिरनं भारताची टॉप ऑर्डर गुंडाळली आणि 4 ओव्हरमध्ये फक्त 18 रन देऊन भारताच्या 3 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पण याच मॅचमध्ये कोहलीनं आमिरच्या बॉलिंगवर संयमी खेळी केली, आणि 51 बॉलमध्ये 49 रनकरून भारताला जिंकवून दिलं. आज होणाऱ्या या मॅचमध्येही क्रिकेट रसिकांचं लक्ष या दोघांवर नक्कीच असेल.