मेलबर्न : ब्रिस्बेन टेस्टनंतर क्रिकेटर्सच्या ड्रेसिंग रुममधल्या वातावरणात तणाव असल्याचं पहिल्यांदा जाहीर केलं ते महेंद्र सिंग धोनीनंच... पण, आज मात्र या भारतीय कॅप्टननं सगळ्याच गोष्टी मजेशीर अंदाजात उडवून लावल्या... आपल्याला वाट्टेल तशा स्टोरिज बनवणाऱ्या आणि मीडियाला देणाऱ्या खेळाडुंनाही त्यानं आपल्याच अंदाजात फैलावर घेतलं.
आज मीडियामध्ये ड्रेसिंग रुममधल्या ज्या कथा छापून येतायत त्यांतून वार्नर ब्रदर्स एक सिनेमा तयार करू शकतील, असं धोनीनं म्हटलंय.
विराट कोहली आणि शिखर धवन यांच्यात वाद होऊन दोघंही एकमेकांना भिडल्याच्या बातम्या येत होत्या... याबद्दल धोनीला खरंच असं घडलं होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं 'विराट कोहलीनं चाकू उचलला आणि शिखर धवनला खुपसला... जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्यानं विराटला धक्का देऊन बॅटींग करायला पाठवलं...' असा टोमणा मारला.
ब्रिस्बेन टेस्ट मॅच दरम्यान धवनच्या हाताला दुखापत झाल्यानं विराट कोहलीला पहिल्यांदा बॅटींगसाठी मैदानात उतरावं लागलं होतं... अचानक हा निर्णय झाल्यानं त्याला पुरेसा वेळ मिळाला नव्हता आणि त्यामुळेच तो शिखरवर चिडला होता... ही गोष्ट मान्य करत धोनीनं, स्थिती थोडी असहज बनली होती असं मान्य केलं.
'असली कथा सांगायची तर या पद्धतीच्या टुकार टॅब्लॉइड वर्तमानपत्र वाचणं ज्यांना चांगलं वाटत असेल किंवा या वर्तमानपत्रांचा खप वाढत असेल... मार्वल आणि वार्नर बंधुंना यावर एकत्रितपणे सिनेमा बनवायला हवा. मला माहीत नाही की या कथा कुठून सुरू होतात... टीमशी निगडीत असलेला एखादा व्यक्ती जर या गोष्टी पसरवत असेल तर आम्हालाही त्या व्यक्तीचं नाव द्या... कारण, त्या व्यक्तीची कल्पनाशक्ती खरोखरच खूप उत्तम आहे. त्या व्यक्तीला सिनेमा क्षेत्रात काम करायला हवं... आमच्या ड्रेसिंग रुममध्ये राहण्याची त्याला काही गरज नाही कारण त्यानं असं काहीतरी निर्माण करून मीडियासमोर सादर केलंय जे घडलंच नाही' असं धोनीनं म्हटलंय.
दोन्ही मॅचमध्ये ३०-३५ मिनिटांच्या खराब खेळामुळे टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला, असंही धोनीनं म्हटलंय. शिवाय आमच्या ड्रेसिंग रुमचं वातावरण खूप चांगलं आहे आणि आमच्यात कोणताही वाद नाही... असं स्पष्ट करायला तो विसरला नाही. उलट, जेव्हाही भारतीय टीम परदेश दौऱ्यावर असते तेव्हा कठिण प्रसंगी मीडिया स्वत:च आपले 'मनाचे श्लोक' वाचून वाचकांसमोर सादर करतात, असंही धोनीनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.