एंटवर्प : जगजितसिंगने काही मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरद्वारे केलेले अफलातून दोन गोल आणि श्रीजेसने केलेल्या नेत्रदीपक गोलरक्षणामुळे भारताने वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत मलेशियाला धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली.
भारताने मलेशियाला ३-२ गोलनी पराभव करून उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित तर केली. शिवाय अझलान शाह हॉकी स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. सतबीरसिंगने तिसऱ्या मिनिटाला गोल करून भारताला १-० गोलची आघाडी मिळून दिली होती. नंतर मलेशियाच्या राजिया रहिमने गोल करून बरोबरी साधली.
२३व्या मिनिटाला शाहारील सबाहने गोल करून मलेशियाला २-१ अशी आघाडी मिळून दिली. भारतीय आघाडीच्या फळीने अनेक व्यूहरचना रचून गोल करण्यापर्यंत प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही.
सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅगफ्लिकर जगजितने गोल करून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर लगेचच भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या वेळीसुद्धा जगजितने कोणतीही चूक न करता मलेशियाच्या गोलरक्षकाला चकवून आपल्या संघाचा तिसरा गोल केला.
८ एप्रिल रोजी अझलान शाह स्पर्धेत मलेशियाने भारताला ३-२ गोलनी नमविले होते. या विजयामुळे भारतीय संघाने त्या पराभवाचा वचपा काढला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.