फेसबुकमुळे उघड होणार तुमचं गुपीत!

फेसबुकवर तुम्ही काय लाइक करतात, यावरून तुमच्या जीवनातील तुमच्या अंतरंगाचे रहस्य उलगडू शकते. हो हे खऱे आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 7, 2013, 05:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
फेसबुकवर तुम्ही काय लाइक करतात, यावरून तुमच्या जीवनातील, तुमच्या अंतरंगाचे रहस्य उलगडू शकते. हो हे खऱे आहे. लंडन येथील संशोधकांनी फेसबुक वापरणाऱ्यांचा बुद्ध्यांक, तुम्ही काय पाहतात किंवा तुमचा राजकीय दृष्टीकोन काय आहे याचा बिनचूक निष्कर्ष काढला आहे.
केम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी अमेरिकेतील 58,000 फेसबुक युजर्सचे मायपर्सनॅलिटी या अॅमप्लिकेशनच्या साह्याने विश्लेषण केले. या अध्ययनासाठी संशोधकांनी लोकांच्या फेसबुक लाइक्सवरून त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयीचे निष्कर्ष काढण्यासाठी ‘गणितीय सिद्धांत’ विकसित केले.
यानुसार हे सिद्धांत ८८ टक्के विश्वासार्ह ठरले. प्रचंड खर्च करून मानसिक मूल्यमापन केंद्र उभारणे किंवा प्रश्नावली देऊन त्याआधारे निष्कर्ष काढण्यापेक्षा ही नवीन पद्धत मानसिक मूल्यमापनाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवून आणू शकते, मात्र यामुळे खासगी जीवन धोक्यात येण्याचीही शक्यता असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.
लाइक्समुळे फेसबुक युजर्सचे ऑनलाइन वर्तन तर कळतेच, शिवाय त्यातून त्याच्या भावनाविश्वाचाही अचूक वेध घेता येऊ शकतो, असे सायकोमेट्रिक सेंटरचे कार्यकारी संचालक मायकेल कोसिन्स्की यांनी म्हटले आहे.