www.24taas.com, औरंगाबाद
फेसबुक म्हणजे एक मुक्त व्यासपीठ.. पण फेसबुक चॅटींगने मात्र बऱ्याचदा घोळ घालून ठेवतो. असाच काहीसा प्रकार औरंगाबाद मध्ये घडला आहे. फेसबुक चॅटींगमुळे अनेक तरूण-तरूणींची मने जुळतात. फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रियकराला भेटण्यासाठी घरातून पलायन करणार्या छावणीतील युवतीने चक्क पोलिसांच्या तोंडाला फेस आणला आहे. सोमवारी मध्यरात्री प्रियकरासोबत पळून जाण्याचा बेत फसल्यानंतरही ही युवती घरी जाण्यास राजी नाही. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
एक २१ वर्षीय युवती काही दिवसांपासून जिन्सी परिसरातील आजीकडे राहायला गेली. फेसबुकवर चॅटिंग करताना तिची मैत्री मुंबईतील एका युवकाशी झाली. काही दिवसांनी या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनीही लग्नाचे स्वप्न रंगवले. त्यांनी मुंबईमध्ये विवाह बंधनात अडकण्याचे ठरवले. त्यानुसार सोमवारी मध्यरात्री युवतीने आजीचे घर सोडले.
मध्यरात्री एकटीच पायी निघालेली ही युवती घाबरत घाबरत सिटी चौक परिसरापर्यंत आली. रात्री या परिसरात फिरणार्या काही टारगट तरुणांनी एकटी युवती बघून तिचा पाठलाग केला. कावरीबावरी झालेल्या या युवतीने प्रसंगावधान राखून पोलिस नियंत्रण कक्षाला मोबाइल कॉल केला. नियंत्रण कक्षाने ठावठिकाणा जाणून घेत सिटी चौक पोलिसांना तिच्याकडे पाठवले. पोलिसांनी तिला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तेव्हा तिने घरातून पलायन केल्याचे स्पष्ट झाले.