www.24taas.com, नवी दिल्ली
डेबिट कार्डाचा गैरवापर करून वाढत असलेल्या आर्थिक गुन्ह्यांची संख्या पाहता तुमच्या डेबिट कार्डावर लवकरच तुमचा फोटो येण्याची शक्यता आहे. डेबिट कार्डासंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नियमावली जारी केली आहे. त्यात डेबिट कार्डावर कार्डधारकाचा फोटो लावावा का अशा सूचना सर्व बँकांकडून मागविण्यात आल्या आहे.
या नियमावलीनुसार डेबिट कार्डाच्या सुरक्षेबाबत काही हेराफेरी झाल्यास त्याची जबाबदारी बँकेची असणार आहे. कार्ड हरविले, चोरी झाले, किंवा कॉपी झाले अशी तक्रार झाली आणि त्यानंतर ग्राहकाचे नुकसान झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी बँकांची असणार आहे. तसेच होणारे नुकसानही बँकांना सहन करावे लागेल.
देशभरात ७० हून अधिक बँकांनी आरबीआयच्या या नियमावलींचे पालन केले तर सुमारे ३१ कोटी डेबिट कार्ड धारकांना फायदा होऊ शकतो.
डेबिट कार्डाच्या सुरक्षेबाबत बँकांनी कसलीही तडजोड करू नये, असे देखील आरबीआयने म्हटले आहे. कार्डाच्या सुरक्षिततेपोटी ग्राहकांचे नुकसान झाल्यास त्यास ती बँक जबाबदार राहणार आहे.
तसेच कार्डाची चोरी झाल्यास किंवा हरवल्यास किंवा बनावट कार्ड सापडल्यास याबद्दलची माहिती त्या ग्राहकाला तत्काळ मिळावी, अशी सुविधा बँकांनी पुरवावी अशी सूचनाही आरबीआयने केली आहे. त्याचप्रमाणे यासंबंधी तक्रार येताच पुढील नुकसान टाळण्यासाठी बँकांनी तत्काळ कार्यवाही करावी असेही आरबीयायने म्हटले आहे. तक्रारींचा तात्काळ निपटारा होण्यासाठीची सक्षम यंत्रणा बँकाकडे असावी, असे देखील आरबीआयने सांगितले आहे.