www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
92 दिवस झाले तरी संपकरी प्राध्याकांची आडमुठी भूमिका कायम आहे. सरकारच्या मेस्माच्या इशा-यानंतर आज हायकोर्टाने प्राध्यापकांना चपराक लगावत दोन दिवसांत इंटरनल्सचे गुण देण्याचे निर्देश दिलेत. मात्र, आजही राज्यातल्या अनेक विद्यापीठांचे निकाल रखडण्याची परिस्थिती निर्माण झालीय.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिके दरम्यान सुनावणी देताना हायकोर्टाने प्राध्यापकांना फटकारलं असून दोन दिवसांत इंटर्नल्सचे 40 गुण कॉलेजमध्ये देण्याचे निर्देश दिलेत. हायकोर्टाच्या सुचनेनंतर प्राध्यपकांनी नरमाईची भूमिका घेत इंटरनल्सचे गुण देणार असल्याचं मान्य केलंय. मात्र, संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर प्राध्यापक ठाम असून मेस्माच्या कारवाईलाही तयार असल्याचं आव्हान प्राध्यापकांनी सरकारला दिलंय.
सरकार आणि प्राध्यापकांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. तसंच राज्यातल्या अनेक विद्यापीठांचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठात पेपर तपासणीसाठी पुरेसे प्राध्यापक नसून त्यामुळे निकाल रखडण्याची शक्यता आहे. सोलापूर विद्यापीठाचे तर पारंपरिक विषयाच्या उत्तर तपासणीचं काम सुरुच झालेलं नाही. नागपूर विद्यापीठात प्रश्नपत्रिकांच्या तुलनेत प्राध्यापक अगदीच कमी असल्याने निकाल उशिरा लागणार आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचेही निकाल उशिरा लागू शकतात.
गेल्या 3 महिन्यांपासून प्राध्यापक आणि सरकार यांच्यात केवळ बैठकाच सुरु आहेत. सरकार प्राध्यापकांवर कारवाईही करत नाही. त्यांच्या मागण्याही पूर्ण करत नाही. यामुळे सरकार हतबल आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय तर दुसरीकडे राज्यभरात निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल याकडे मात्र, कुणाचंच लक्ष नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.