www.24taas.com, लंडन
सोशल वेबसाईट ‘ट्विटर’वर टीव-टीव करून तुमचं वजन कमी होऊ शकणार आहे... ऐकायला थोडं उटपटांग वक्तव्य वाटतंय का? पण, हाच दावा एका नव्या संशोधनात करण्यात आलाय.
‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना’च्या ‘अर्नाल्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’नं हा दावा केलाय. लोकांना वजन घटवण्याचं आवाहन करणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या ‘डायटीशिअन’नं टाकलेल्या पोस्ट खूप महत्त्वाचं काम करतात, असं या नव्या संशोधनात आढळून आलंय.
‘डेली मेल’ या वृत्तपत्रानुसार नेहमी आपलं स्टेटस अपडेट राहावं याची काळजी घेणारे सोशल वेबसाईट युजर्स आपलं स्वास्थ्य, खाण्या-पिण्याच्या वेळा आणि व्यायामाबाबत जास्त वाचतात. ते जितकं जास्त वाचतील तेवढं त्यांचं वजन कमी होईल. जवळपास १० ट्विटर अपडेटस् वाचल्यावर लोक आपलं वजन ०.५ टक्के कमी करू शकतात.
प्रमुख शोधकर्ता बीराई टर्नर मॅकग्रेवी यांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्ती नियमितपणे चालता-फिरताना ट्विटरचा वापर मोबाईलवर करतात त्यांना वजन घटवण्यासाठी जास्त फायदा होतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९६ जाड्या महिला आणि पुरुषांवर हा प्रयोग करण्यात आला. या सगळ्यांना सहा-सहा जणांच्या टीममध्ये विभागण्यात आलं. सर्वांनी एक एप्लिकेशन डाऊनलोड केलं, जे खाण्यापिण्यावर आणि शारिरीक हालचालींवर लक्ष ठेवतं. काहींनी आपल्या स्मार्टफोनवर ट्विटर एप्लिकेशनही डाऊनलोड केलं.
ज्या लोकांनी ट्विटर डाऊनलोड केलं होतं त्यांनी इतरांपेक्षा जास्त प्रमाणात वजन कमी केलं. टर्नरच्या म्हणण्यानुसार, या लोकांनी नियमितपणे डायटीशिअन्सला फॉलो केलं होतं.