कारमध्ये तीन मुलांचा गुदमरून मृत्यू

भिवंडी तालुक्यात खुल्या गोदामातील नव्या कारमध्ये अडकलेल्या तीन लहान मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 25, 2013, 11:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,ठाणे
जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात खुल्या गोदामातील नव्या कारमध्ये अडकलेल्या तीन लहान मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
दिलीप अमर माझी (७), रूबी अमर माझी (५) आणि राज विनोदसिंग सोनी (६) अशी मुलांची नावे असून ते काल्हेरपाडा येथील मोरू पाटील यांच्या चाळीत आपल्या आईवडिलांसह राहत होती. घर आणि गाड्यांचे गोदाम या दरम्यान असलेल्या झाडाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता खेळत असताना ही तीन मुले अचानक गायब झाली. या मुलांचा शोध घेतल्यानंतर मुलांची आई उमा अमर माझी यांनी रात्री ११ वाजता नारपोली पोलीस स्टेशनमध्ये तीन मुले हरवल्याची तक्रार नोंदवली.

या घटनेची गंभीर दखल घेत नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि जवळच असलेल्या खुल्या गोदामातील महिंद्र कंपनीच्या प्रत्येक मोटारीचा दरवाजा उघडून तपासणी केली, तेव्हा पहाटे ३ वाजता एका कारमध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले.
दिलीप आणि रूबी हे दोघे सख्खे भाऊ-बहीण असून राज सोनी हा त्यांच्या शेजारी राहत होता. त्या तिघांचे मृतदेह इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले असता कारमधील उष्णता आणि कोंडलेल्या श्वांसामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गाड्यांच्या गोदामास एका बाजूने भिंतीचे कम्पाउंड नसल्याने तेथून ती तीन मुले गाडीत जाऊन बसली. परंतु, त्यांना बाहेर निघता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नारपोली पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.