www.24taas.com, झी मीडिया, पुणे
तुमचा गावित करण्याची वेळ आणू नका, अशी दमबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना खडसावले. अधिकृत उमेदवाराचे काम करा, असे सातत्याने सांगूनही काहीजण ऐकत नाहीत. त्यांना आता शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे, असे अजित पवार म्हणालेत.
पुण्यातील चिंचवड आणि आकुर्डीत झालेल्या दोन स्वतंत्र बैठकीत अजित पवारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे मावळचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, विनोद नढे, बाबासाहेब तापकीर, सचिन साठे, नाना शितोळे, हनुमंत गावडे आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्षविरोधी काम केल्यास कठोर कारवाई केली जाईल, तुमचा गावित करण्याची वेळ माझ्यावर आणू नका, अशा शब्दात पवार यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा दम भरला. डॉ. गावित यांनी राष्ट्रवादीत राहून पक्षविरोधी काम केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली. तसेच त्यांचे मंत्रिपदही काढून घेतले.
आपल्या राष्ट्रवादीत मला काँग्रेसप्रमाणे `वर` विचारावे लागत नाही आणि कोणाला उत्तरही द्यावे लागत नाही. मी थेट कारवाई करू शकतो. गावितांच्या बाबतीत थोडे सबुरीने घ्या, असे मला सांगण्यात येत होते. मात्र, मी तडकाफडकी कारवाई केली. त्या पद्धतीने तुमच्यावर कारवाई करण्याची वेळ आणू नका, अशी तंबी यावेळी दिली.
यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मोदींचा कारभार एकतर्फी आहे. तर उद्धवचे दुर्बल नेतृत्व असून भाजप हा नकली पक्ष आहे. ज्यांनी पक्ष वाढवला, त्यांनाच पक्षात किंमत नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेला नेतृत्व देऊ शकत नसल्याने पक्षाची दुरवस्था झाली आहे. तिकीट विकल्याचा आरोप खासदार गजानन बाबर यांनीच केला. त्यामुळे त्या पक्षात काय चालते, हे दिसून आलंय, असे अजित पवार म्हणालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.