www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोकण रेल्वे मार्गावर नाताळच्या सुट्टीदरम्यान संपूर्ण वातानुकुलित (AC) शताब्दी एक्स्प्रेस धावणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली, ग्वाल्हेर, भोपाळ या मार्गावर धावणारी ‘शताब्दी’ एक्स्प्रेस प्रथमच कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. खास नाताळसाठी कोकण रेल्वेने ही सोय केली आहे. नाताळच्या सुट्टीत कोकण तसेच गोव्यात जाणार्या चाकरमान्यांसाठी एसी प्रवासचा लाभ घेता येणार आहे. शताब्दी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमाळी अशी धावणार आहे.
गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने ही विशेष गाडी सुरू केली आहे. १५ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत शताब्दी एक्स्प्रेस सुरू राहणार आहे. या गाडीचे आरक्षण १४ डिसेंबरपासून सुरू होईल. अप मार्गासाठी ट्रेन क्र. ०२११३ तर डाऊन मार्गासाठी ट्रेन क्र. ०२११४ आहे. ही गाडी आठवड्यातून पाच दिवस धावेल. सोमवार आणि गुरुवारी ही एक्स्प्रेस धावणार नाही.
छत्रपती शिवाजी टर्मिनसहून पहाटे ५.३० वाजता निघून दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी ही गाडी करमाळी स्थानकात पोहोचेल. त्याचप्रमाणे करमाळी स्थानकातून ३ वाजून २० मिनिटांनी सुटून ही गाडी मध्यरात्री १२.३५ वाजा छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी या स्थानकावर थांबणार आहे. या गाडीला १ एक्झिक्युटिव्ह एसी बोगी, ७ एसी बोगी तर दोन जनरेटर कम गार्ड बोगी, पॅण्ट्रीकार असे डबे असतील.
आणखी दोन खास गाड्या
हिवाळी हंगामासाठी कोकण रेल्वेने आणखी दोन विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. या गाड्या याच महिन्यात सुरू होणार आहे १४ आणि १७ डिसेंबरपासून या गाड्या धावतील.
०१०६५ मुंबई सीएसटी - एर्नाकुलम् आणि ०१०६६ एर्नाकुलम् - मुंबई सीएसटी तसेच ०१०६७/०१०६८ मुंबई सीएसटी - मुंबई एसटी-तिरुनेलवेली या दोन गाड्या परतीच्या मार्गासाठीही असणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.