www.24taas.com झी मीडिया , नवी मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी मुंबईत गरजलेत. त्यांनी राज्य सरकारला टार्गेट केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ठाकरी भाषेत समाचार घेतला. अजित पवार आम्ही गांडू नाहीत. तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राज यांनी दिला.
राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील मनसे कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर आक्रमक रूप धारण करीत अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. अजित पवार कंपनी आहे ना. त्यांची दादागिरीची भाषा आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही सभ्यपणे बोलतोय याचा अर्थ आम्ही गांडू नाहीत. अजित पवार तुमची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुमच्याकडे प्रस्थापिक असतील तर आमच्याकडे विस्थापीत आहेत. लक्षात ठेवा, आम्ही घरात घुसून मारू, हे याआधीच सांगून ठेवलेय, हे ध्यानात ठेवावे, असा गंभीर इशारा राज यांनी जाहीर सभेत अजित पवारांना दिला.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री व्हिलनप्रमाणे बोलतात. त्यांचं ते बोलण पाहा. कसं तोंड फाकवून बोलतात.. ७०च्या काळातील व्हीलन वाटतात, असे सांगत त्यांची नक्कल केली. तसेच उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल चढविला. नवी मुंबईचा डोंगर पोखरला जातोय. याला लगाम घातला पाहिजे, असा थेट हल्ला राज यांनी केला.
यापुढे कोणीही टोल भरू नका. मनसेनेने टोलविरोधात सर्वप्रथम मोठं आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारने ६५ टोल नाके बंद केलेत. रस्ता बांधून झाल्यानंतर टोल सुरू करायचा असतो. इथं आधीच टोल नाके उभारले जातात. यापुढे कोणीही टोल भरू नका. जर कोणी मागितला तर त्याला उत्तर द्या. मागणी केली तर त्याला तुडवून काढा. यापुढे कोणीही टोल भरायचा नाही. जे काही व्हायचे असेल ते होऊ द्या, असा आदेश राज यांनी दिला. आमच्या कार्यकर्त्यांवर केस पडल्या आहेत. त्या आम्ही मागे घेऊ. कारण आगामी निवडणुकीत मनसेची सत्ता येईल, असा दावा राज यांनी केला.
अभिनेता सैफ अली खानला कसला पद्मश्री पुरस्कार देता. त्याला करीना दिलेन ना. मग पुरस्कार कशासाठी, असा सवालही राज यांनी उपस्थित केला. अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना पुरस्कार दिलात. मात्र, त्यांच्या मारेकरांचा शोध का लावला जात नाही, असा प्रश्न यावेळी केला.
यावेळी मनसे कार्यकर्त्यांना सल्ला दिला. तुम्ही लोकांची मने जिंका. लोकांची कामे करा. नवी मुंबईतील घराघरांत पोहचा. तुम्हाला लोक आपलेसे करतील, हे लक्षात ठेवा, असे राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संदेश दिला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ