www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
शिवकालीन ऐतिहासिक यशवंतगडाची चक्क विक्री करण्यात आली आहे. हा प्रकार माहितीच्या अधिकारा उघड झाला आहे. हा किल्ला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाटे येथे आहे.
जैतापूर खाडीकिनारी वसलेल्या गावात सोळाव्या शतकात विजापूरकरांनी उभारलेला ऐतिहासिक यशवंतगड आहे. सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार या गडाची मालकी विश्वनाथ रघुनाथ पत्की यांच्याकडे आहे. त्यांनी हा किल्ला ९९ वर्षांच्या कराराने आंबोळगड येथील अरविंद तुकाराम पारकर यांना विकला. १८ ऑक्टोबर २०१२ रोजी ३५ लाख रुपयांना या गडाची विक्री झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. माहिती अधिकारात समीर शिरवडकर यांनी ही माहिती उघड केली.
देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्वच किल्ले राष्ट्रीय मालमत्ता बनले असताना हा किल्ला पत्की यांच्या मालकीचा कसा, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. नाटे येथील मंडल अधिकाऱ्यांकडून माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. त्यात या जलदुर्गाची ९९ वर्षांच्या भाडेकराराने विक्री झाल्याचे उघडकीस आले. तर राजापूर तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी आणि पुरातत्त्व विभाग यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळून आलेय. त्यामुळे या किल्ल्याच्या विक्री व्यवहाराचे गौडबंगाल वाढले असल्याचे शिरवडकर यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.