पाच राज्यांतील विधानसभेत काँग्रेसला केवळ `ठेंगा`!

आज झालेल्या मतमोजणीनुसार, ४० पैकी २१ जागांचा बहुमताचा आकडा पार करून काँग्रेसनं मिझोरममध्ये विजयाची नोंद केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 9, 2013, 09:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, आयजोल (मिझोरम)
आज झालेल्या मतमोजणीनुसार, ४० पैकी २८ जागांवर काँग्रेसनं विजय प्राप्त केलाय. २१ हा बहुमताचा आकडा पार केल्यानं काँग्रेसनं मिझोरममध्ये एकहाती सत्ता स्थापन करता येणार आहे. त्यामुळे, विधानसभेच्या शेवटच्या टप्यात झालेल्या पाच राज्यांत झालेल्या निवडणूकीत काँग्रेसची ‘चार बोटं’ कापली गेली असली तरी ‘अंगठा’ मात्र काँग्रेसला मिळालाय, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियामधून व्यक्त होत आहेत. लोकसभेची सेमीफायनल म्हणून ओळखल्या गेलेल्या या निवडणुकीत काँग्रेसचं नाक मात्र कापलं गेलंय, हे आता सोशल वेबसाईटच्या प्रतिक्रियांमधून उघड होतंय.

दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांत सपाटून आपटल्यानंतर आज मात्र काँग्रेसला थोडा दिलासा मिळाला. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये चारीमुंड्या चीत झालेल्या काँग्रेसला मिझोरमने थोडासा दिलासा दिलाय. मिझोरमध्ये घोषित झालेल्या ३३ जागांच्या निकालांपैकी २८ जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. तर चार जागा मिझो नॅशनल फ्रंटच्या खात्यात गेल्या आहेत. तर इतरांना केवळ एक जागा मिळाली आहे. मात्र त्यापूर्वीच ४० जागांच्या विधानसभेत काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवले आहे. बुडत्या काँग्रेसला मिझोरमचा आधार असंच म्हणण्याची वेळ यानिमित्तानं काँग्रेस नेत्यांवर आलीय.

आज सकाळी आठ वाजल्यापासून राज्यातील आठ जिल्हा मुख्यालयात मतमोजणी करण्यात आली. २५ नोव्हेंबर रोजी इथं मतदान पार पडलं होतं. यावेळी ८१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी १४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यामध्ये सहा महिला उमेदवारांचा समावेश होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.