www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सत्तेची सेमी फायनल मानल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ४-० अशी बाजी मारली आहे.
शिवराजसिंह चौहान आणि रमण सिंग यांनी सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवित अनुक्रमे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 'हॅटट्रिक' साधली आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसचा धुवाँ उडवत पुन्हा एकदा महाराणी वसुंधराराजे शिंदे यांनी दणदणीत विजय मिळविला. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) डेब्यू मॅचमध्येच चमत्कार घडवत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.
छत्तीसगडमध्ये मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांपर्यंत भाजप आणि काँग्रेसचे संख्याबळ बरोबरीत होते. पण भाजपने ४९ जागा मिळवत छत्तीसगडमध्येही भाजपने पुन्हा सत्ता कायम राखली आहे.
चार राज्यांतील मतमोजणीला आज सकाळी सव्वाआठ वाजता सुरवात झाली. मिझोराम वगळता दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे निकाल आज जाहीर झाले. मिझोराममध्ये नऊ डिसेंबरला म्हणेज उद्या मतमोजणी होणार आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांच्यातील लढतीच्या सेमीफायनलमध्ये मोदी यांनी बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.
एक्झीट पोलमध्ये बहुतेक सर्वांनी भाजपच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला होता. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला आम आदमी पक्षामुळे दिल्लीत सलग चौथा विजय साजरा करता आला नाही.
राजस्थानमध्ये एन्टी इन्कबन्सीचा तोटा काँग्रेसला झाला तर या लाटेचा फायदा भाजपला झाला. राजस्थानात काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि भाजप नेत्या वसुंधराराजे यांच्यात वर्चस्वाचा सामना होता. त्यात महाराणी वसुंधराराजे यांनी बाजी मारली.
मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची स्वच्छ प्रतिमा आणि त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा मान त्यांना मिळाले आहे. छत्तीसगडमध्येही "चावलवाले बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुख्यमंत्री रमणसिंह यांनीही आपला गड राखला आहे. शिवराज चौहान आणि रमणसिंग यांच्या विजयाने भारतात सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा मान मोदीनंतर दोघांना मिळाला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.