लाखो 'मोबाईल अॅप्स' वापराविना पडून, अॅप्सचं मार्केट थंडावलं!

 आपण टेक्नो सेव्ही नाही का काय? असा प्रश्न निर्माण झालाय. ऐूकून आश्चर्य वाटलं ना... पण हे खरंय... मोबाईल जगतात सुमारे पाच ते सहा लाख अॅप्सना प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती समोर आलीय.  

Updated: Jul 20, 2016, 08:34 PM IST
लाखो 'मोबाईल अॅप्स' वापराविना पडून, अॅप्सचं मार्केट थंडावलं! title=

मेघा कुचिक, मुंबई : आपण टेक्नो सेव्ही नाही का काय? असा प्रश्न निर्माण झालाय. ऐूकून आश्चर्य वाटलं ना... पण हे खरंय... मोबाईल जगतात सुमारे पाच ते सहा लाख अॅप्सना प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती समोर आलीय. ही अॅप्स डाऊनलोडच होत नसल्यानं आता या अॅप्सचं मार्केटिंग मोठ्या प्रमाणात करण्याची वेळ आलीय.

बाजारात सुमारे ६० लाख अॅप्स उपलब्ध 

व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, एम इंडिकेटर अशी अनेक अॅप्स आपण स्मार्ट फोनवर दररोज वापरतो. मात्र यासारखी ६० लाख अॅप्स नेटच्या बाजारात उपलब्ध आहेत. एका सर्वेक्षणानुसार, 

- अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीवर गुगल प्ले या अ‍ॅप बाजारात २२ लाख ७० हजार ६०५ 

- अ‍ॅपल ऑपरेटिंग प्रणालीवर २२ लाख अ‍ॅप्स 

- विंडोज या ऑपरेटिंग प्रणालीवर ६ लाख ६९ हजार अ‍ॅप्स 

- अ‍ॅमेझॉन अ‍ॅप स्टोअरमध्ये सहा लाख

- ब्लॅकबेरी वर्ल्डमध्ये २ लाख ३४ हजार ५०० अ‍ॅप्स 

असे एकूण तब्बल ६० लाख अॅप्स उपलब्ध आहेत. यातील सुमारे सहा लाख अ‍ॅप डाऊनलोडशिवाय पडून असल्याचा धक्कादायक खुलासा आयटी तज्ज्ञ मयूर कुलकर्णी यांनी केलाय.  

स्मार्ट फोनच्या जमान्यात अनेक कामे एका क्लिकवर होत असली तरी सहा लाख अॅप्स डाऊनलोडच होत नाहीत. एक तर यातल्या अनेक अॅप्सची माहितीच आपल्यापैंकी अनेकांना नाहीय. तर अनेक फ्री अॅप्सनाच पसंती असल्यानं पैसे मोजून अॅप्स सुरु ठेवण्याकडे लोकांचा कल कमीच दिसतो. यात अॅप्स बनवणं कमी गुंतवणुकीत शक्य असल्यानं अनेक हौश्या नवश्यांचे अॅप्स दररोज बाजारपेठेत दाखल होतात. त्यामुळे आता अॅप्सच्या मार्केटिंगमध्ये वाढ झालीय. 

एका क्लिकच्या आधारे अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणून अ‍ॅपकडे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबर त्याची उपयुक्तता हाही महत्त्वाचा भाग आहे. यातील लाखो अॅप्स हे शैक्षणिक उपयुक्ततेचेही आहेत. मात्र सर्वाधिक वापर हा सोशल साईट्स, गेम्स आणि मनोरंजनाच्या अॅप्सचाच होतोय. नव्या मार्केटिंग फंड्यामुळे काही उपयुक्त अॅप्सचा प्रसार झाला तर तो आपलं नेट ज्ञान वाढण्यात उपयोगीच ठरेल हे नक्की...