रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला का जात होत्या? मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे खळबळजनक आरोप

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकतर अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करा.. नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिलाय.. त्यामुळे निकालाचा वाद आता कोर्टाच्या दारात पोहोचला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 17, 2024, 09:11 PM IST
रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला का जात होत्या? मुंबई उत्तर पश्चिम  मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे खळबळजनक आरोप  title=

Amol Kirtikar vs Ravindra Waikar News: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने पुन्हा केलाय.. 19 व्या फेरीनंतर गडबड झाल्याचा दावा ठाकरे पक्षाने केलाय.. आता निकालाचा हा वाद कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचणार आहे.  19 व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली.  19 व्या राऊंडनंतर आमची मतं मोजलीच नाही, असा खळबळजनक दावा अनिल परबांनी केला आहे.

निकालावर ठाकरे गटाने काही आक्षेप घेतले आहेत.  आमच्या प्रतिनिधीत आणि एआरओ यांच्यात प्रचंड अंतर आहे.  19व्या फेरीपर्यंत मतं कळायची थांबली होती.  ती थेट 22 आणि 23 व्या फेरीनंतर समजली.  फॉर्म 17सीमध्ये प्रत्येक ईव्हीएममधल्या मतांची माहिती असते.  मात्र हा फॉर्म 17 सी अनेकांना दिला नाही.  फॉर्म 17 C part 2 मागणी करुनही दिला नाही. फॉर्म 17 C part 2 द्वारे आमची मते आणि त्यांची मोजलेली मते याची टॅली होते. आयोगाच्या आणि आमच्या मतमोजणीत 650 मतांचा फरक आहे.

रिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला जात होत्या. रिटर्निंग ॲाफिसरला वारंवार फोन येत होते. सीसीटीव्ही फुटेज देण्यास वेळखाऊपणा का? 10 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला.  10 दिवसात मोबाईल बदलले गेले असा आरोप ठाकरे गटाने केला.  रिटर्निंग ऑफिसरचा इतिहास तपासून बघा.  रिटर्निंग ऑफिसरवर किती गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घ्या.  रिटर्निंग ऑफिसर किती वेळा निलंबित झाल्या तेही पाहा असे आक्षेप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतले आहेत.

जर निवडणूक यंत्रणा भाजपच्या हातात नसती तर भाजपाला 240 काय 40ही जागा मिळाल्या नसत्या असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.  वायकरांचा विजय मॅनेज करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप ठाकरे पक्षाने केलाय.. सरकारी यंत्रणेद्वारे कीर्तिकरांचा विजय ढापल्याचा आरोप करत ठाकरे पक्ष आता कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे.. तेव्हा आता कोर्टातच याचा काय निकाल लागतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.