अमोल जोशी, वृत्तनिवेदक
एक आटपाट जंगल होतं. रोजच्या मानानं जंगलात आज भलतीच घाई सुरू होती. जंगलात आज प्राण्यांचा जाहीर टॉक शो होणार होता. निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. कार्यक्रमाच्या सूत्रधारापासून पाहुण्यांपर्यंत सगळ्यांची यादी जाहीर झाली होती. समस्त प्राणी परिवाराबरोबरच माणसाचा प्रतिनिधी म्हणून मिडियाला बोलावण्यात आलं होतं. जंगलातल्याच एका मोकळ्या जागेत स्टेज उभारण्यात आलं होतं. त्याच्या आजूबाजूचा परिसर अभ्यागतांच्या आसनव्यवस्थेसाठी साफसूफ करण्यात आला होता. प्राण्यांनी हळूहळू बसून घेतलं, गोंधळ कमी कमी होत गेला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
लांडगा - नरांनो आणि माद्यांनो, नमस्कार. या विशेष टॉक शो मध्ये आपलं स्वागत. मानवजातीकडून प्राण्यांच्या होणाऱ्या बदनामीचा निषेध करण्यासाठी आणि मानवाला त्याची चूक दाखवून देण्यासाठी या टॉक शोचं आयोजन करण्यात आलंय. प्राण्यांकडं पाहण्याचा मानवी दृष्टीकोन पहिल्यापासून कलुषित होताच. आता मात्र प्राण्यांची बदनामी करण्याची मोहिमच जणू मानवानं उघडल्याचं दिसतंय. हे असं का होतंय? यामागं कुणाचा हात आहे? यासारख्या प्रश्नांची उकल करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी मान्यवर पाहुणे म्हणून आपण आमंत्रित केलंय वाघ, कुत्रा, कबुतर आणि माणूस यांना. तर माणसा, मानवजातीकडून प्राण्यांची विनाकारण बदनामी केली जाते, हा आरोप तुला मान्य आहे का?
माणूस – मुळीच नाही. मुळात तुम्ही पाहुणे म्हणून मला बोलावलंत, आणि इथं मात्र मला ये-जा करत आहात. यालाच रानटी वृत्ती असं आम्ही म्हणतो. मानव जात ही त्याच्याकडं असलेल्या सभ्यतेमुळंच प्राण्यांपेक्षा वेगळी ठरते. सुरुवातीलाच तुम्ही नरांनो आणि माद्यांनो असं म्हणालात. आमच्याकडं बंधुंनो आणि भगिनींनो असं म्हणतात. त्यातूनही एक सभ्यता दिसते.
वाघ – प्राण्यांना अशी तोंडदेखली नाती जोडण्याची गरज वाटत नाही. तोंडावर बंधूंनो आणि भगिनींनो म्हणायचं आणि वेळ आली की बंधुंनी भगिनींवर बलात्कार करायचा. प्रत्येक जातीत नर आणि मादी हेच दोन प्रमुख घटक आम्ही मानतो आणि त्यांचा आदरही राखतो.
माणूस – पण ही नाती आम्ही तोंडदेखली जोडतो, असं म्हणायला काय आधार आहे?
वाघ – दिल्लीतल्या तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार विसरलास?
माणूस – त्याचं काय?
वाघ – तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांपैकी एकानं तिला अगोदर ‘कम ऑन सिस्टर’ असं म्हणून बसमध्ये बोलावल्याचं मी कुठंसं ऐकलं. एवढंच काय, तुमच्या डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या शहरात भावानंच सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचंही ऐकलं. नाही जमत नाती पाळणं, तर कशाला उगाच माद्यांना बहिणी वगैरे म्हणत असता?
माणूस – ठिक आहे. ठिक आहे. आपण विषय सोडून दुसरीकडं भरकटतोय. प्रस्तावनेत लांडग्यानं मूळ मुद्दा असा मांडला होता, की माणसांकडून प्राण्यांची बदनामी होते आहे. हा अत्यंत बालिश आरोप असून पब्लिसिटी स्टंट आहे, असा माझा उलटा आरोप आहे.
कबुतर – मी सांगतो या आरोपाचं कारण. माणसाच्या घरांच्या खिडक्या आणि गॅलऱ्यांमध्ये बसून मी प्रत्यक्ष पाहिलंय. जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, तेव्हा त्या कृत्याचं वर्णन ‘पाशवी बलात्कार’, ‘मानव झाला पशू’ असं केलं जातं. बलात्कारासारख्या अत्यंत हीन कृत्याला प्राण्यांशी जोडणं हा प्राण्यांचा अपमान तर आहेच, शिवाय माणूस ज्ञातीच्या अज्ञानाचीही परिसीमा आहे.
माणूस – त्यात अज्ञानाचा प्रश्न कुठं आला? एखादा आरोपी एखाद्या महिलेवर अत्याचार करतो, तेव्हा त्यांना पाशवीच म्हटलं पाहिजे. रानटीच म्हटलं पाहिजे.
कुत्रा – पण का? पाशवी का? रानटी का?
माणूस – कारण असे प्रकार मानव जातीला शोभणारे नाहीतच. असे प्रकार जंगली प्रवृत्तीचे लोकच करू शकतात. अन्यथा, एवढा शिकलेला, पुढारलेला, सुसंस्कृत असलेला मानव बलात्कार वगैरे हीन गोष्टी का करेल?
कुत्रा – बलात्कार फक्त मानवच करतो.