विकेन्ड डेस्टीनेशन : ताम्हिणी घाट

रस्त्याच्या एका बाजूला दरी आहे आणि दुसऱ्या बाजुला डोंगर... डोंगराच्या घोळांमधून पाणी झिरपतंय काही ठिकाणी थोडं थोडं... काही ठिकाणी धबधबे... रस्त्याच्या कडेवरचे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 3, 2014, 09:53 AM IST
विकेन्ड डेस्टीनेशन : ताम्हिणी घाट title=

शुभांगी पालवे, झी मीडिया
(shubha.palve@gmail.com)

यंदा पावसाला थोडी लवकरच सुरुवात झालीय. आपसुकच ट्रेकरर्सच्या उत्साहाला आणि प्लानिंगलाही.... पाऊस कोसळून धरणीच्या कुशीत शिरतोय आणि निसर्गवेडे बाहेर पडण्यासाठी आसुसलेत. पण, ‘टाईम मॅनेजमेट’... ही मुंबईकरांना कधीही न चुकलेली अन् कधीही न जमलेली एक गोष्ट आडवी येते आणि सगळंच मागे पडतं... मात्र, ऑफिस, कुटुंब आणि घरातली इतर कामं यातून एक दिवस मिळणारी सुट्टी भटकण्यात घालवणारे मुंबईकर आहेतच की... अशाच मुंबईकरांसाठी आम्ही माहिती देत आहोत मुंबई-ठाण्या-पुण्याच्या जवळपासच्या ‘विकेन्ड डेस्टीनेशन्स’ची... जिथे तुम्ही तुमचा एक दिवस तुमच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि पावसासोबत मस्त मजेत घालवू शकता. आज आपण जाऊयात... पुण्यापासून जवळजवळ ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ताम्हिणी घाटात.... 

ताम्हिणी घाट 
विचार करा, घाटातल्या वळणावळणाच्या रस्त्यावरुन तुम्ही गाडीतून जाताय... बाईक असेल तर उत्तमच. पाऊसाची हलकिशी रिमझिम रिमझिम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूला दरी आहे आणि दुसऱ्या बाजुला डोंगर... डोंगराच्या घोळांमधून पाणी झिरपतंय काही ठिकाणी थोडं थोडं... काही ठिकाणी धबधबे... रस्त्याच्या कडेवरचे... रस्त्यावरून प्रवास करताना आपल्या बाजुलाच उंचावरच्या धबधब्यातून पाणी कोसळतंय... मग काय, गाडीला थोडा वेळ विसावा देऊन या धबधब्यात भिजायचा वेडेपणा न करणारे दुर्मिळच! 

पुणेकरांना हे काही फार लांब पडणार नाही. पहाटे निघाले तरी कोवळ्या उन्हात ताम्हिणीला पोहचू शकतात. अशा वेळी विचार करा, काय सुंदर वातवरण आणि निसर्ग दृश्यं तुम्हाला पाहायला मिळू शकतात. कदाचित तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असं दिवसाढवळ्या समोरचं सगळं गायब करणारं धुकं, धुक्यात हरवलेली वाट आणि चहोबाजुंनी डोकं वर काढलेले उंचच उंच डोंगर... डेअरिंग असेल तरच बाईक काढा. आडवळणाच्या रस्त्यात अपघात होणार नाही याची काळजी घ्या कारण खरंच हा प्रवास खूप सुंदर असला तरी तितकाच धोकायदायकही आहे. 

ताम्हिणी घाटात पोहचणार कसं... 
गुगलवर संपूर्ण नकाशा पाहण्यासाठी पुढील लिंकवर कॉपी करून दुसऱ्या विंडोमध्ये ओपन करा - http://goo.gl/OUIYJ 

मुंबईतून ताम्हिणीला जायचं असेल तर तुम्ही दोन मार्गांचा वापर करू शकता...
- पहिला म्हणजे मुंबई – मुंबई पुणे महामार्ग – अॅम्बी व्हॅलीवरून मुळशी डॅम आणि पुढे ताम्हिणीवर पोहचता येईल. 
- दुसरा रस्ता म्हणजे मुंबई – गोवा महामार्गावरून कोलाड आणि तिथून ताम्हिणी घाटामध्ये पोहचता येईल. कोलाडपासून ताम्हिणी घाट जवळजवळ ६० किलोमीटर अंतरावर आहे. पण घाटातील वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे वेळ जास्त लागतो. 

- हातात स्वत:ची गाडी असेल आणि थ्रील अनुभवायचं असेल तर मुंबईतून सुरुवात केल्यानंतर मुंबई पुणे महामार्ग घेऊन ताम्हिणीला पोहचा आणि मुंबईला परतताना दुसरा मार्ग म्हणजे कोलाड 

- मुंबई गोवा महामार्ग घेऊन पुन्हा मुंबईत दाखल होऊ शकता. 

- पुण्याहून निघत असाल तर पिरंगुट, पौड, मुळशी मार्गे ताम्हिणी घाटात दाखल होऊ शकता. 

- तुमच्याजवळ स्वत:ची गाडी नसेल तर फार काळजी करण्याची गरज नाही कारण इथं पोहचण्यासाठी एसटीचीही सोय आहे. पुण्याहून कोकणात ये-जा करणारी कोणतीही एसटी या मार्गावरून जाते. पण, जाण्यापूर्वी गाड्यांची वेळ मात्र पाहून घ्यायला विसरू नका.

- दुर्मिळ वनस्पती आणि जीवसृष्टी इथं आढळत असल्यानं नुकताच ताम्हिणी घाटाला अभयारण्याचा दर्जा दिला गेलाय. अनेक दुर्मिळ वनस्पती इथल्या निमसदाहरीत जंगलात सापडतात. तसंच बिबट्या, शेकरू, सांबर, गिधाड अशा वन्यजीवांचं अस्तित्वही इथं आढळतं. घाटाच्या सुरुवातीला आणि शेवटी छोटी छोटी गावंही आहेत.