www.24taas.com, नवी दिल्ली
आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर त्याचे पडसाद आज संसदेतही उमटले. भाजपा आणि समाजवादी पार्टीनं या आरोपाच्या सखोल चौकशीची मागणी केली.
एका टिव्ही चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आयपीएलमधील खेळाडू, आयोजक, मालक आणि भारतातील काही क्रिकेट जानकारांमध्ये फिक्सिंगची बोलणी रेकॉर्ड झालेली आहे. भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी हा मुद्दा संसदेमध्ये मांडला. आयपीएल मॅचेसमध्ये विदेशी चलनांसहीत अनेक गोष्टींचं उल्लंघन होतंय, असा आरोप त्यांनी यावेळी केला. सर्व क्रिकेट असोसिएशनच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
या फिक्सिंगमध्ये भारतीय क्रिकेटमधील एक सुपरस्टार आणि एका टीमच्या कर्णधाराचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय काही खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व मॅच फिंक्सिंग करीत असल्याचा दावा, या टिव्ही चॅनेलने केला आहे. दरम्यान, या टिव्ही चॅनेलने बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी श्रीनिवासन म्हणाले, खेळाच्या अखंडतेबाबत विश्वास आहे. जर हे वृत्त खरे असेल तर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. आमच्याकडे स्टिंग ऑपरेशन केलेले टेप दिली तर ती पाहून यात कोण कोण आहे, ते पाहिले जाईल. त्यानुसार संबंधित खेळाडूंवर कारवाई केली जाईल. जर प्रथमदर्शी यात तथ्य आढल्यास दोषी खेळाडूंना निलंबित केले जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे श्रीनिवासन म्हणाले.